
Kalyan News: खाकी वर्दीचा गैरवापर? मज्जाव केल्याचा राग धरत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप!
Kalyan News : टिटवाळ्यातील व्यावसायिक राजन दुबे आणि कौशल झा यांच्याशी संबंधित वादग्रस्त प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. आपल्यावर तसेच कौशल झा यांच्यावर पोलिसांनी जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप व्यावसायिक राजन दुबे यांनी केला आहे. या अन्यायाविरुद्ध आपण आता मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत व्यावसायिक राजन दुबे आणि त्यांचे वकील ॲड. अभिषेक पालवे यांनी कल्याण येथे एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी आपल्यावरील गुन्हे कसे खोटे आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी काही व्हिडिओ आणि सविस्तर माहिती माध्यमांसमोर मांडली. काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी कौशल झा यांची चौकशी केली होती. ज्यावेळी हा प्रकार घडला, त्यावेळी राजन दुबे हे त्यांच्या हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त कौशल झा यांच्यासोबत उपस्थित होते.
पोलिसांना इतर आरोपींबाबत हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी कौशल झा यांची चौकशी करायची आहे, असे टिटवाळा पोलिसांकडून सांगण्यात आले होते. यावर दुबे यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांना कार्यक्रम संपल्यानंतर कौशल झा यांना स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो, अशी विनंती केली होती आणि त्याला परवानगीही मिळाल्याचे दुबे यांचे म्हणणे आहे.
या दरम्यानच, ठाणे ग्रामीण लोकल क्राईम ब्रँचचे (LCB) पोलीस एका कारमधून अचानक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कौशल झा यांना बळाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजन दुबे यांनी संबंधित पोलीस अधिकारी नेमके कोण आहेत, याची कायदेशीर विचारणा केली होती. मात्र, पोलिसांनी याच गोष्टीचा राग मनात धरून पुढील कारवाई केल्याचा गंभीर आरोप दुबे यांनी केला आहे.
त्यानंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी आपल्यावर धक्काबुक्की केल्याचा खोटा आरोप लावला आणि परस्पर गुन्हा दाखल केला, असा दावा दुबे यांनी केला आहे. ज्या घटनेशी कौशल झा यांचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता, त्यांनाही या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर संबंधित तत्कालीन टिटवाळा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली झाली असली, तरी आपल्या व कौशल झा यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेऊन अद्याप कोणतीही योग्य कारवाई झालेली नाही, अशी खंत दुबे यांनी व्यक्त केली. पोलीस ठाण्यात असताना लोकल क्राईम ब्रँचच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याशी अत्यंत गैरवर्तन केले, असा आरोपही त्यांनी केला.
या संदर्भात राजन दुबे यांनी एक व्हिडिओही समोर आणला आहे, ज्यामध्ये ते पोलिसांसोबत अत्यंत शांतपणे केवळ कायदेशीर बाबींवर चर्चा करताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या सर्व गंभीर आरोपांवर संबंधित पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसल्यामुळे या प्रकरणाला आता कोणते वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: आपल्यावर आणि कौशल झा यांच्यावर पोलिसांनी जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप राजन दुबे यांनी केला आहे.
Ans: या संपूर्ण अन्यायाविरुद्ध आणि खोट्या गुन्ह्याविरोधात राजन दुबे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
Ans: