अजुबा ब्रीजवर घाणीचे साम्राज्य; मनसेचा पालिका-MMRDA प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम
अजुबा ब्रीज परिसरातील झाडांची योग्य देखभाल होत नसल्याने अनेक झाडे मृतावस्थेत असल्याचेही मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. एका बाजूला विकासकामांच्या नावाखाली वृक्षारोपण केले जाते, तर दुसऱ्या बाजूला लावलेल्या झाडांच्या संगोपनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राणे यांनी केला. त्यामुळे मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि MMRDA प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
अजुबा ब्रीज हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा या मार्गावरून होते. अशा ठिकाणी कचरा, अस्वच्छता आणि मद्यपींचा वाढता वावर ही गंभीर बाब असल्याचे मनसेने म्हटले आहे. प्रशासनाने तातडीने परिसराची स्वच्छता करावी, मृत झाडे हटवावीत तसेच मद्यपींच्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, “अजुबा ब्रीजवरील घाणीचे साम्राज्य आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. येत्या २४ तासांत ब्रीजची संपूर्ण स्वच्छता करून कचरा आणि मृत झाडे हटवली नाहीत, तर हा कचरा आणि मृत झाडे थेट MMRDA कार्यालयात आणून टाकू,” असा इशारा मनसे मिरा-भाईंदर शहराध्यक्ष संदिप राणे यांनी दिला आहे.
नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही राणे यांनी दिला.
Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल






