
फोटो सौजन्य- pinterest
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील बदल्यानंतर कोपरखैरणे वाहतूक विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी योगेश शिंदे यांनी स्वीकारली आहे. मात्र, नवीन प्रभारी अधिकारी रुजू होऊन काही दिवस उलटले तरी कोपरखैरणे परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर प्रभावी नियोजन आणि प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असताना, काही ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि दुसरीकडे ई-चालानच्या माध्यमातून कारवाईचा वेग यामुळे ‘वाहतूक नियंत्रण की दंडवसुली?’ असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. कोपरखैरणेतील डी-मार्ट सर्कल, कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसर तसेच घणसोली रेल्वे स्थानक परिसरात सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
दरम्यान, कोपरखैरणे वाहतूक विभागाची काही वाहने विशिष्ट औद्योगिक आस्थापना तसेच गर्दीच्या दुकानांच्या बाहेर उभी राहत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. काही दुकानमालकांना ‘वाहतूक चौकीत भेटा’ असे निरोप दिले जात असल्याच्या चर्चाही परिसरात सुरू आहेत. या चर्चामुळे वाहतूक विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे या चर्चाची सत्यता तपासणे आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणे ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
वाहतूककोंडी निर्माण होणाऱ्या प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ तैनात करण्याऐवजी, वाहतुकीला तुलनेने अडथळा नसलेल्या ठिकाणी ई-चालान मशीन घेऊन वाहनचालकांवर कारवाई करताना कर्मचारी दिसत असल्याचे चित्र नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ‘वाहतूक नियमांची अंमलबजावणी महत्त्वाची की नागरिकांना वाहतूककोंडीतून दिलासा देणे?’ हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यकच आहे. मात्र, त्याचवेळी वाहतूक कोंडी सोडविणे, बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवणे, चौकांमध्ये वाहतूक प्रवाह सुरळीत करणे आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक नियमन करणे हीदेखील वाहतूक विभागाची तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. समतोल राखण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोपरखैरणेतील वाहतूक व्यवस्थेबाबत वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आता नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त राहुल खाडे यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे, नव्याने जबाबदारी स्वीकारलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रमुख कोंडीच्या ठिकाणी मनुष्यबळाची योग्य तैनाती, बेशिस्त पार्किंगवर कारवाई, सिग्नल व्यवस्थापन आणि गर्दीच्या वेळेत प्रभावी वाहतूक नियमन करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी ठोस निर्देश देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दंडाची पावती देणे हे वाहतूक पोलिसांचे एक काम आहे; मात्र नागरिकांना कोंडीतून मुक्त करणे ही त्यांची त्याहून मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने ई-चालानच्या आकडेवारीपेक्षा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: डी-मार्ट सर्कल, कोपरखैरणे रेल्वे स्थानक आणि घणसोली रेल्वे स्थानक परिसरात गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी अधिक जाणवते.
Ans: बेशिस्त पार्किंग, वाढलेली वाहनांची संख्या, गर्दीच्या वेळेतील वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव आणि अपुरे मनुष्यबळ ही प्रमुख कारणे मानली जातात.
Ans: गर्दीच्या वेळेत प्रमुख चौकांमध्ये मनुष्यबळ वाढवणे, बेशिस्त पार्किंगवर कारवाई करणे आणि वाहतूक नियमन प्रभावीपणे करणे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.