
फोटो सौजन्य- gemini
नवी मुंबई शहरात रात्रीच्या वेळी बेकायदेशीर अन्नपदार्थांचे स्टॉल्स आणि चायनीज गाड्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. यापूर्वी व्यावसायिक उत्पादक कव्हर किंवा आडोसा करून फास्ट फूडचे व्यवसाय चालवत असत. मात्र, आता दिघा ते उरणपर्यंत संपूर्ण शहरात, थेट मुख्य हायवे आणि महत्त्वाच्या चौकांमध्येच बिंदासपणे रात्रीच्या वेळी चायनीज, भुर्जीपाव आणि आईस्क्रीमचे स्टॉल्स मांडले जात आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा तर निर्माण होतच आहे, पण रस्त्यावर उघड्यावर चालणाऱ्या सिलेंडरच्या वापरामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
काही महिन्यांपूर्वीच रबाळे येथील एका चायनीज फूड स्टॉलवर सिलेंडरचा अचानक स्फोट झाला होता. सुदैवाने त्यावेळी मोठी जीवितहानी टळली, तरीही पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणेने या घटनेतून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. पूर्वी केवळ गाव-गल्लीत मयांदित असलेले हे व्यवसाय आता थेट राष्ट्रीय महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवर सर्रासपणे रात्रभर सुरू असतात. ग्राहकांच्या गाड्या रस्त्यातच अस्ताव्यस्त पार्क केल्या जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी पथके अधूनमधून या गाड्यांवर कारवाईचा देखावा करतात. मात्र, कारवाईचा सोपस्कार पार पडताच काही तासांतच परिस्थिती ‘जैसे थे’ होते.
मुख्य रस्त्यावर गॅस सिलेंडर वापरून उघड्यावर अन्न शिजवले जात आहे. जर उद्या एखादी मोठी दुर्घटना किंवा सिलेंडर ब्लास्ट झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पोलीस प्रशासन की संबंधित हद्दीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ? की पालिका किरकोळ दंडात्मक कारवाईऐवजी अशा गाड्या बेट जप्त करून कायमचा बंदोबस्त का केला जात नाही? रात्रीच्या वेळी हायवे आणि प्रमुख चौकात सुरू असणाऱ्या या फास्ट फूड स्टॉल्समुळे मद्यापी व असामाजिक तत्वांचा वावरही वाढला आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या स्टॉल्सच्या परिसरात ग्राहकांची गर्दी, वाहनांची अनियमित पार्किंग आणि रस्त्यावरील अडथळे यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. काही ठिकाणी मद्यपी आणि असामाजिक घटकांचा वावर वाढत असल्याची चिंताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी गस्त आणि देखरेख वाढवण्याची आवश्यकता आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)