
अंबरनाथमध्ये राहणारी अंजू काळे ही २३ वर्षीय महिला काही वैयक्तिक कामानिमित्त कल्याणला गेली होती. रात्री ८ च्या सुमारास ती अंबरनाथला येण्यासाठी लोकलमध्ये चढली. लोकलने प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. वेदनांनी विव्हळणाऱ्या अंजू यांना पाहून डब्यातील इतर प्रवाशांच्या काळजात धस्स झाले. काय करावे, हे कोणालाही सुचत नव्हते. रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी लोकल अंबरनाथ स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर दाखल झाली. गाडी थांबताच काही प्रवाशांनी तातडीने स्थानकावरील आरपीएफ कार्यालय गाठले आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली.
माहिती मिळताच ऑन ड्युटी असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नन्देश्वर यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने संबंधित लोकल डब्याकडे धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्यांनी अत्यंत शांतपणे आणि धैर्याने निर्णय घेतले. त्यांनी तातडीने डब्यातील सर्व पुरुष प्रवाशांना खाली उतरवले. डब्याचे दोन्ही दरवाजे बंद करून घेण्यात आले. महिला प्रवाशांच्या मदतीने चादर आणि उपलब्ध कापडांचा वापर करून प्रसूतीसाठी सुरक्षित आडोसा तयार केला.
Indian Railways News: विनातिकीट प्रवाशांना रेल्वेचा दणका! ९ महिन्यांत वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड
उपनिरीक्षक सोनाली नन्देश्वर आणि उपस्थित महिला प्रवाशांच्या मदतीने अंजू काळे यांची सुरक्षित प्रसूती पार पडली. काही वेळातच डब्यातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि स्थानकावर चिंतेत असलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले. अंजू यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता.
प्रसूतीनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका पाचारण केली. आई आणि नवजात बाळाला तातडीने अंबरनाथमधील छाया रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसूती सुखरूप झाली असून माय-लेक दोघींचीही प्रकृती सध्या स्थिर आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नन्देश्वर यांनी दाखवलेले धाडस आणि समयसूचकतेचे प्रवाशांकडून तसेच सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे.
Mumbai Local : काय सांगता! लोकल प्रवासी घटले, तरीही उपनगरीय लोकलला गर्दी