
रविंद्र चव्हाण यांच्यासोबत हजारो भगिनींचा रक्षाबंधन सोहळा
डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीतील सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी मुलींचा सुद्धा यावेळी उत्स्फूर्त सहभाग बघायला मिळाला. डोंबिवली आणि कल्याण मध्ये दिवसभर रवींद्र चव्हाण यांच्यासाठी रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर तर दुपारी सम्राट चौक येथील जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने डोंबिवलीतील रविंद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात अनोखे कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते. “जीवाभावाचा रविदादा” म्हणत सर्व महिलांनी रविंद्र चव्हाण यांच्याविषयीचा जिव्हाळा आणि आपुलकी व्यक्त केली.
याप्रसंगी रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले की राखीच्या धाग्यात गुंफलेलं बहिणींचं निरागस प्रेम, निरागस हसरे चेहरे, डोळ्यांतील स्वप्नं आणि आपुलकीचा जिव्हाळा… आज प्रत्येक राखीने मनाला एक वेगळीच उब दिली. डोंबिवलीतील अशा अनेक लहानग्या बहिणींनी प्रेमाने हातावर राखी बांधली. त्यांच्या चिमुकल्या हातांनी मनगटावर बांधलेली ही राखी मनात खोलवर रुजली. त्या निरागस क्षणांमध्ये रक्षाबंधनाच्या नात्याची खरी श्रीमंती अनुभवायला मिळाली. काही बहिणी वयाने लहान असल्या तरी या बहिणींच्या मनातली स्वप्नं मोठी आहेत. त्यांना भरारी घेता यावी, स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि आयुष्याकडे आत्मविश्वासाने पाहता यावं, यासाठी त्यांच्या वाटचालीत शक्य तेवढं योगदान देत राहीन, हाच संकल्प करतो, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.