
Ravindra Chavan
Pune News : राज्याच्या राजकारणात सध्या बरीच धामधूम सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. आधीच विरोधकांकडून तसेच विद्यार्थी आणि जेन झी कडून विविध विषयांवरून आंदोलने, निदर्शने होत आहेत. तसेच आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत कलहदेखील पाहायला मिळत आहे. अश्यातच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत असून पुण्यातील भाजपच्या 100 नगरसेवकांना पक्षाकडूनच नोटीशी धाडण्यात आल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे पुण्यातील भाजप नगरसेवकांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या भाजप उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या सुमारे १०० नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नगरसेवकांना पाच दिवसांत आपला खुलासा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मागील आठवड्यात पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह पक्षातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपला मोठा धक्का; मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेची खासदारकीही सोडली
पुणे भाजपसाठी अतिशय महत्वाच्या मानल्या गेलेल्या या कार्यक्रमासाठी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे निरोप देण्यात आले होते. मात्र, शंभरपेक्षा अधिक नगरसेवकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याचे समोर आले. काही नगरसेवक कार्यक्रमाला आले, पण काही वेळातच निघून गेले, अशीही माहिती आहे.
या कार्यक्रमाला अपेक्षेप्रमाणे उपस्थिती नसल्याचे लक्षात आल्यानंतर सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपस्थित नगरसेवकांची नावे नोंदवण्याची सूचना केली. त्यांनी स्वतः सभागृहात फिरून कोणते नगरसेवक उपस्थित आहेत, याची खातरजमा केल्याचे सांगितले जाते.
यानंतर अनुपस्थित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे आणि पक्षशिस्त पाळणे अपेक्षित असल्याने या गैरहजेरीबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
पुणे महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले असून, सात स्वीकृत सदस्यांसह पक्षाचे एकूण संख्याबळ १२६ असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे १०० नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.
संबंधित नगरसेवकांना पाच दिवसांत उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर खुलाशांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केला जाणार असून, पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. आता संबंधित नगरसेवक आपल्या गैरहजेरीबाबत काय स्पष्टीकरण देतात आणि पक्षाकडून पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल
Ans: रवींद्र चव्हाण यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला गैरहजर राहिलेल्या सुमारे १०० नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Ans: संबंधित नगरसेवकांना पाच दिवसांत आपला खुलासा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Ans: नगरसेवकांच्या खुलाशांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.