
शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 20 तारखेपासून 'या' मोहिमेची होणार सुरुवात
मुंबई : राज्यात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे पण वाढत्या शहरीकरणासाठी पायाभुत सोयी सुविधा पुरवण्यात सरकार कमी पडत आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे आजही शहरे बकाल बनली आहेत. चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पार्किंग, प्रदुषण यासह अनेक समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकार व महापालिका प्रशासन शहर विकासाच्या नावाखाली फक्त कोट्यवधी रुपयांचा निधी लाटण्याचे काम करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. शहराच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर परिवर्तन गट सुरु केला असून या मोहिमेचे उद्घाटन २० ऑगस्ट रोजी सर्व महानगरपालिका क्षेत्रात होणार आहे.
शहर परिवर्तन गटाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तेलंगणाचे सहप्रभारी व वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर संग्राम खोपडे हे या गटाचे समन्वय आहेत. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन शहर परिवर्तन गटाच्या कार्यक्रमाची रुपरेषा जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.
भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
वंदे मातरम राष्ट्रगितावरून भारतीय जनता पक्ष राजकारण करत आहे हे अत्यंत हास्यास्पद आहे. वंदे मातरम हे १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात पहिल्यांदा गायले गेले व तर २४ जानेवारी १९५० रोजी ते देशाचे राष्ट्रीयगीत म्हणून स्वीकारण्यात आले. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्या उपस्थितीत याचा निर्णय झालेला असून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात व कार्यक्रमात ते गायिले जाते. भारतीय जनता पक्षाकडून एक व्हिडिओ प्रसारित करून काँग्रेसविरोधात अपप्रचार केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना जास्त वेळ उभा राहता येत नाही ये लक्षात घेऊन सोनियाजी गांधी काही सुचना करत आहेत परंतु भाजपा कडून मात्र वंदे मातरमचा अपमान केल्याचा अपप्रचार केला जात आहे, हा अपप्रचार थांबवावा. वंदे मातरम बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवण्याची गरज नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.