पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याच्या टँकरची मागणीही वाढत आहे. सध्या महापालिकेकडून नागरिकांना दिवसाला एक हजार ते बाराशे टँकर पुरविले जातात. दरम्यान, या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ आर्थिक वर्षामध्ये ४७ हजार ४१२ टँकरची वाढ झाल्याने महापालिकेने दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी खडकवासला धरणासह भामा आसखेड धरणातून पाणी उचलले जाते. याशिवाया ज्या परिसरात कमी पाणीपुरवठा होतो, त्या परिसरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेने शहरात विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेसह ठेकेदाराच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. एका ठेकेदाराकडे कमीत कमी ८ टँकर असावेत, असे बंधन टाकण्यात आले आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने समाविष्ट गावांसह उपनगरांमधून टँकरची मागणी वाढली आहे. बाणेर-बालेवाडी भागात महापालिकेकडून दिवसाला २०० पेक्षा अधिक टँकर पुरविले जात आहेत. त्यासोबतच फुरसुंगी-उरुळी या गावांनाही दिवसाला २०० पेक्षा अधिक टँकर दिले जातात. समाविष्ट ११ गावांना जवळपास ४००, तर २३ गावांना सव्वाशे टँकर दिवसाला दिले जातात. कात्रज-कोंढवा भागात पद्मावती येथून टँकर दिले जातात.
२०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ आर्थिक वर्षामध्ये ४७ हजार ४१२ टँकरची वाढ झाली आहे. २१-२२ मध्ये वर्षभरात ३ लाख ६ हजार ८४२ टँकर झाले होते, तीच संख्या२२-२३ मध्ये ३ लाख ५४ हजार २४५ वर गेली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये टँकरची संख्या वाढल्याचे माहितीवरून स्पष्ट होत आहे.
– महापालिकेकडून महिन्याला ४०० टँकर पाणी मोफत
– एका महिन्यात २५ ते २७ हजार टँकरसाठी शुल्क
– महापालिका, ठेकेदाराचा टँकर असेल तर नागरिकांना ९२० रुपयांचे चलन
– टँकर खासगी असेल तर ६०४ रुपयांची पावती
– खासगी टँकरधारकांनी नागरिकांकडून किती पैसे घ्यावेत, यावर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्यामुळे टँकर माफियांचे फावते.