Pune News : शहरात ओव्हरहेड केबलचा विषय जोरात चर्चेत; तोडगा काढण्यासाठी अनेक पर्याय समोर (फोटो सौजन्य: iStock)
पुणे : शहरातील ओव्हरहेड केबलचा विषय सध्या जोरात चर्चेत असून, यातून तोडगा काढण्यासाठी काही पर्याय समोर येऊ लागले आहे. स्ट्रीट लाईटच्या खांबांचा वापर या केबल्स टाकण्यासाठी करता येऊ शकतो, अशी चर्चाही आता सुरु झाली आहे.
शहरात अनियंत्रितपणे पसरलेल्या ओव्हरहेड केबल्सवर सध्या रोज कारवाई केली जात आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हे याविषयी आग्रही असून, या केबल काढून त्या भूमिगत केल्यातर महापालिकेला चौदाशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा दावा त्यांनी केला आहे. कारवाई सुरु झाल्यानंतर इंटरनेट पुरवठादार व्यावसायिकांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी व्यावसायिकांच्या अडचणी सांगितल्या, कारवाई स्थगित करण्याची मागणी केली. यावेळी चर्चेत भिमाले हे देखील सहभागी झाले होते. संबंधित व्यावसायिकांनी एक ‘एसओपी’ (नियमावली ) तयार करुन ती सादर करावी असा निर्णय या बैठकीत झाला.
भूमिगत केबल कितपत व्यवहार्य?
महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे साडे तीन हजार ओव्हरहेड केबल बेकायदेशीरपणे टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. तर स्थायी समितीचे अध्यक्ष भिमाले यांच्या दाव्यानुसार सुमारे दहा हजार किलोमीटर इतक्या लांबीच्या या केबल आहेत. या केबल भूमिगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदाई करावी लागेल. तसेच नुकतेच महाप्रीत, पुणे पोलिसांनाही काही केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईची परवानगी दिली आहे. आता नव्याने या ओव्हरहेड केबल टाकण्यासाठी खोदाईची परवानगी द्यावी लागेल. यातून रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागेल, त्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही खर्च करावा लागू शकतो.
स्ट्रीट लाईटच्या पोलचा वापर शक्य?
देशातील काही शहरांत इंटरनेट केबल टाकण्यासाठी स्ट्रीट लाईट पोलचा वापर केला जात आहे. पुणे शहरात एक लाखाहून अधिक स्ट्रीट लाईट पोल आहेत. याचा उपयोग केला तर रस्ते खोदाई करावी लागणार नाही. त्याचप्रमाणे शहराचे विद्रुपीकरण कमी होण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे. तसेच या पोलचा वापर करणाऱ्यांकडून शुल्क घेता येऊ शकते. यासंदर्भातील एक प्रस्ताव महापालिकेकडे आल्याचे भिमाले यांनी नमूद केले आहे.






