राज्यात ई-बॉन्ड-ई-स्टॅम्पिंग सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा (Photo Credit- X)
मुंबई: राज्य सरकारने प्रशासनाला डिजिटल स्वरूप देण्यासाठी एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शुक्रवारी घोषणा केली की, इलेक्ट्रॉनिक बाँड्स (ई-बॉन्ड्स), ई-स्टॅम्पिंग, ई-सिग्नेचर आणि ऑनलाइन पेमेंटची सुविधा आता संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे. ही सुविधा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील १७ वे राज्य बनले आहे.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मंत्रालय, मुंबई येथे एकल अनुबंध कस्टम ई – बाँड प्रणालीचा शुभारंभ केला. पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी व अर्थमंत्री @nsitharaman जी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या महसूल विभागाने ही प्रणाली महाराष्ट्रासाठी सुरू… pic.twitter.com/yBLumE9J01 — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 3, 2025
डिजिटल उपक्रमाच्या घोषणेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या परदेश दौऱ्यातील वक्तव्यावरून कडाडून टीका केली. कोलंबियामध्ये राहुल गांधी यांनी भारताच्या लोकशाहीवर केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापले आहे.
बावनकुळे यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप करत म्हटले की, “परदेशात कितीही बोलले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. राहुल गांधी देशात आपली प्रतिमा निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे आता ते परदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहेत.”
“राहुल गांधी देशाचा वारंवार केलेला अपमान जनतेला मान्य नाही आणि देशातील जनता त्यांना धडा शिकवेल,” असा इशाराही बावनकुळे यांनी दिला. तसेच, “जर राहुल गांधींना भारत आवडत नसेल, तर त्यांनी इटलीला जाऊन त्यांचे काम करावे,” अशी उपहासात्मक टीकाही महसूलमंत्र्यांनी केली.