सौजन्य - नवराष्ट्र टीम
सांगली : महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदाऱ्या वाटून घेऊन संघटितपणे प्रचार करावा. त्याचप्रमाणे पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सक्षम नेतृत्व निवडण्याची ही संधी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) नेते जयंत पाटील यांनी केले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा पार पडला.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पदवीधरांच्या अस्वस्थतेला आणि प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. हर्षदा देशमुख-जाधव या लोकांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत, तर जयंत आसगावकर यांनी विधान परिषदेत शिक्षकांचे प्रश्न नेहमीच प्रभावीपणे मांडले आहेत.
काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा व अस्वस्थतेचा संदर्भ देत परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी केली. तसेच, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत, शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर आणि विकासाच्या बाबतीत कोणत्याही भागावर दुजाभाव न करता समान न्याय देण्याची गरज व्यक्त केली.
हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, आजची झेन-झी आणि येणारी नवीन पिढी अधिक जागरूक आहे. त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि भवितव्याचे प्रश्न वेळीच न सोडवल्यास ही पिढी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पदवीधर आणि शिक्षकांना सक्षम करणे हाच महाविकास आघाडीचा मानस आहे.
सांगली हे माझे आजोळ ; नातीला, भाचीला आशीर्वाद द्या : हर्षदा देशमुख-जाधव
“ग्रामीण आणि शहरी भागाची सांगड घालण्याचे बाळकडू मला सांगलीतूनच मिळालेले आहे. माझे आजोळ सांगली जिल्ह्यातील लेंगरे असून माझे बालपण याच मातीत गेले आहे. त्यामुळे मी सांगलीची नात व भाची आहे. आपल्या या नातीला आणि भाचीला तुमचा आशीर्वाद द्या,” असे भावनिक आवाहन पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी मेळाव्यात केले.






