सांगलीत मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात? 'या' बड्या नेत्यांची नावं चर्चेत
सांगली : सांगली जिल्ह्यात भाजप महायुतीला दणदणीत विजय मिळाला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सांगली जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ आता पाच आमदारांचे झाले आहे. मंत्रिपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, खानापूरचे सुहास बाबर व जतचे गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर सत्यजित देशमुख यांचाही विचार होऊ शकतो.
विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे हे सलग चौथ्यांना भाजपमधून निवडून आले आहेत, तर सुधीर गाडगीळ यांनीही विजयाची हॅट्रिक केली आहे, त्यामुळे हे दोन आमदार जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार आहेत. यापूर्वी खाडे यांच्याकडे समाजकल्याण खात्याचे राज्यमंत्रीपद होते. त्यानंतर ते कामगार मंत्री म्हणून कार्यरत होते. नव्या टर्ममध्ये त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय सलग पाचवेळा आमदार आणि मंत्रीपदाचा दीर्घ अनुभव पाहता त्यांची वर्णी चांगल्या खात्यावर लागू शकते. गाडगीळ यांना गेल्या टर्ममध्येच मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. या निवडणुकीत विजय मिळाल्याने मंत्रिपदाची दावेदारी प्रबळ झाली आहे. १० वर्षांच्या विधीमंडळाच्या अनुभवामुळे त्यांना मंत्रीपद मिळू शकते. गाडगीळ यांना गतवेळी न मिळालेले मंत्रिपद यावेळी मिळू शकते.
पडळकरांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये अपयश पचवून तगडा अनुभव सोबतीला असणारे भाजपचे राज्यातील वजनदार नेते गोपीचंद पडळकर हेदेखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जाते. पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. आजवर त्यांनी विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे. आता थेट लोकांतून निवडून आल्याने मंत्रिपदाची दावेदारी वाढली आहे. भाजपच्या कोट्यातून त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता अधिक आहे.
हे सुद्धा वाचा : रस्ता ओलांडताना जोरात बस आली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
अनिल भाऊंच्या निष्ठेचेचे सुहास बाबर यांना फळ
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे सुहास बाबर यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळण्याचा विक्रम केला आहे. शिवसेनेचे विभाजन होताना पहिल्या १२ आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने निष्ठेने राहिलेले, अनिल बाबर यांना देखील शेवटच्या टप्प्यात मंत्रिपद देण्यात येणार होते; मात्र ते काही कारणाने देता आले नाही, याची खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली आहे, या निष्ठेची पावती म्हणून सुहास बाबर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.