कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भिकाऱ्यांची दादागिरी; भाविकांना सहन करावा लागतोय त्रास
कोल्हापूर/दिपक घाटगे : करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली भिक्षेकऱ्यांची वाढती संख्या भाविकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच पायऱ्यांजवळ भिक्षेकऱ्यांचा अक्षरशः उन्हमाद दिसून येत आहे. शारदीय नवरात्रौत्सव सोहळा सध्या मंदिरात सुरू आहे, याचाच फायदा घेत हे भिक्षेकरी शहरात आले आहेत. मिरजहून रेल्वे पॅसेंजर गाडीतून हे सकाळी येतात, दिवसभर मंदिर आवारात बसतात. संध्याकाळी याच गाडीने परत जातात असा यांचा दिनक्रम ठरला असल्याचे दिसून येते. गेले दोन दिवसापासून या भिक्षेकऱ्यांनी आपले स्थान अंबाबाई मंदिर परिसरात केले आहे.
भाविक मंदिरात प्रवेश करताच लहान मुले, महिला आणि वृद्ध भिकारी हात पसरून पैसे मागताना दिसतात. काही जण तर थेट पायाला धरून पाठीमागे लागतात, ज्यामुळे भाविकांची गैरसोय होते. दर्शनासाठी आलेले पर्यटक आणि परदेशी पाहुणे यांच्यासमोर ही परिस्थिती शहराच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरत आहे. मुळात हे खरेच भिक्षेकरी आहेत का? चोऱ्या माऱ्या करणाऱ्या टोळ्या आहेत हे संशयास्पद आहे.
भाविकांना सहन करावा लागतोय त्रास
मंदिर परिसर स्वच्छ व पवित्र ठेवण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असला तरी भिकाऱ्यांचा वाढता तगादा आणि त्यांच्यातील गटागटातील भांडणे वातावरण बिघडवतात. विशेषतः सण-उत्सव काळात ही समस्या अधिकच तीव्र होते. नवरात्र, पौर्णिमा, तसेच शनिवार-रविवारच्या गर्दीत भिक्षेकऱ्यांचा इतका विळखा असतो की भाविकांना त्रास सहन करावा लागतो. स्थानिक व्यापाऱ्यांनी याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. भाविक दुकानात खरेदी करायला गेले तरी भिकाऱ्यांचा तगादा सुरूच राहतो. यामुळे ग्राहक दुरावतात आणि व्यापारावर परिणाम होतो. अनेकदा शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज
मंदिर परिसरात पोलिसांची तात्पुरती गस्त असली तरी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. काही सामाजिक संस्थांनी भिकाऱ्यांच्या पुनर्वसनाची मागणी केली असली तरी ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी भिकाऱ्यांना हटवले जाते; मात्र काही दिवसांनी ते पुन्हा त्याच ठिकाणी परततात. दरम्यान, मंदिर परिसरात वाढत चाललेला भिकाऱ्यांचा उन्हमाद थांबवण्यासाठी देवस्थान समिती, नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी एकत्रित येऊन ठोस पावले उचलण्याची गरज आहे. भाविकांना सुरक्षित, शांत व पवित्र वातावरण मिळावे, ही सर्वांचीच अपेक्षा आहे.