लाख रुपये खर्च करून देखील सिवूडस येथील पाळणाघर बंद, माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी महापालिकेला धरले धारेवर
नवी मुंबई महानगरपालिकेने सिवूडस विभागात 2021 मध्ये लाखो रुपयांचा खर्च करून बांधलेले पाळणाघर अद्यापही कार्यान्वित झालेले नाही. या प्रकल्पाच्या विलंबाबाबत आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट आरोप करत महापालिकेच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच पर्दाफाश केला.
हा प्रकल्प 2018 साली महासभेत मंजूर करण्यात आला होता. कामकाजी पालकांना मदत व्हावी, या उद्देशाने पाळणाघर उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार सिवूडस विभागात एक सुसज्ज इमारत उभारण्यात आली. या इमारतीसाठी इंटिरियर, रंगकाम, सीसीटीव्ही कॅमेरे अशा विविध बाबींवर लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, आज सात वर्षांनंतरही हे पाळणाघर सुरू झालेलं नाही.
विशाल डोळस यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करत सांगितले की, “जर हे पाळणाघर सुरू करण्याचा मानसच नव्हता, तर इतका मोठा खर्च का करण्यात आला? इमारत बांधल्यावर तिला इतकी वर्षं रिकामी का ठेवली? आणि आता याच इमारतीचा उपयोग न करता ती अवघ्या १२,००० रुपयांना भाड्याने का देण्यात येत आहे?”
Pune News: एकीकडे 1300 टँकरने पाणीपुरवठा तर दुसरीकडे दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
डोळस यांनी यावेळी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, याबाबत नागरिकांना खोटी माहिती दिली जात आहे. पाळणाघर चालवण्यासाठी आयसीडीएस (एकात्मिक बाल विकास सेवा) विभागाशी समन्वय साधल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात आयसीडीएस विभागाकडे सध्या अशा प्रकारचा कोणताही अधिकृत एसओपी (मानक कार्यप्रणाली) उपलब्ध नसल्यामुळे हे पाळणाघर सुरू करणे शक्यच नसल्याचे त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
विशाल डोळस यांनी सांगितले की, “महापालिकेने आधी स्वतःच हे पाळणाघर चालवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता ते हात झटकून जबाबदारी टाळत आहेत. प्रशासनाच्या भूमिकेत झालेला हा अचानक बदल नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारा आहे.”
पाळणाघर वेळेत सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. कामकाजी पालकांना दिलेले आश्वासन हवेत विरल्यासारखे वाटत आहे. पालिकेने यासाठी खर्च केलेल्या निधीबाबत पारदर्शकता दाखवली पाहिजे, अशी मागणी डोळस यांनी केली आहे.
मान्सूनचे आगमन मात्र पुणे अजूनही तहानलेलेच! ऐन पावसाळ्यात तब्बल 1,300 टँकरने होतोय पाणीपुरवठा
“जर प्रकल्प सुरू होणार नसेल, तर त्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार? लाखो रुपयांचे नुकसान कोण भरून काढणार?” असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला असून, या प्रकरणात तातडीने कारवाई करून पाळणाघर सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे.