पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा; वर्षभरात भरला 90 कोटींचा दंड; तब्बल बारा लाख...
पुणे : पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी तसेच पोलिसांना मदतीसाठी लावलेले सीसीटीव्ही शहराची सुरक्षा सांभाळतनाच पुणेकरांवर आर्थिक भार देखील टाकत आहेत. गुन्हेगारांपासून सुरक्षित ठेवण्यापेक्षा या सीसीटीव्हींचा अधिक उपयोग वाहन चालकांवर दंड कारवाईसाठी पुणे पोलिसांना होत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ९० कोटींचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, बारा लाख वाहनांवर केलेली ही कारवाई आहे. सीसीटीव्ही बसविल्यापासून पोलिसांच्या कारवाईत किमान चौपट वाढ झाल्याचे पाहायला मिळते. तरीही प्रथमच सीसीटीव्ही बसविल्यापासून दंडाचा आकडा शंभर कोटींच्या आत आला आहे. त्यातही हेल्मेट कारवाई कमी करण्यात आली आहे.
शहराचा विस्तार झपाट्याने होताना नागरीकरण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरिकीकरण वाढल्यानंतर आपसूक वाहनांची संख्या वाढली. तुलनेत मात्र, रस्त्यांची संख्या अन् त्यांची रूंदी तेवढीच आहे. यासर्व गोष्टींमुळे शहरात वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र शहरात दिसून येते. जगभरात पुणे वाहतूक कोंडीत सहावरून चौथ्या क्रमांकावर आल्याचेही एका खासगी संस्थेच्या सर्व्हेवरून समोर आले होते.
पुण्यात वाहतूक कोंडीत भर पडते, ती बेशिस्त वाहन चालकांमुळे. त्यामुळे वाहतूक समस्येत अडथळा, खोळंबा व संतगतीने होत असते. अशावेळी वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाईवर भर देतात. त्यात सीसीटीव्हीवरून कारवाई होत असल्याने हा आकडा वाढता-वाढत आहे. पोलिसांच्या इतक्या कारवाईनंतर देखील बेशिस्तांची संख्या मात्र वाढलेलीच आहे. पोलिसांनी आपल्या हद्दीत २०२४ या वर्षात ११ लाख ८७ हजार ६९३ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईे केली. त्यात वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांपासून धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांचा समावेश आहे.
हेल्मेट कारवाई कमी
गेल्या काही वर्षात वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत हेल्मेट कारवाईचे प्रमाण सर्वाधिक राहत होते. मात्र, यंदा हेल्मेट कारवाईचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. त्या तुलनेत वाहतुकीला अडथळा करणाऱ्या किंवा रस्त्यावर नो-पाकिंगमध्ये उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर सर्वाधिक, अर्थात ३ लाख ६९ हजार वाहनांवर कारवाई झाली आहे. त्यापाठोपाठ एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवरील कारवाई अधिक आहे. नो-एंट्रीत घुसखोरी करणाऱ्या १ लाख ७९ हजार ५६८ वाहन चालकांवर कारवाई केली आहे.
‘सीसीटीव्ही’वर जोर
वाहतूक पोलिसांकडून सीसीटीव्हीनंतर पुण्यात हेल्मेट सक्तीवर कारवाई केली जात होती. कोट्यवधींचा दंड एकट्या हेल्मेट कारवाईचा असत. सर्वाधिक कारवाई हेल्मेट न घालणाऱ्यांवर होत असत. परंतु, गेल्या वर्षात सीसीटीव्ही कारवाई कमी करण्यात आली असून, अन्य बेशिस्तांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी हेल्मेट पेक्षा बेशिस्त वाहन चालकांना जरब बसविण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना सोपी असलेली हेल्मेट कारवाई घटली. १ लाख २४ हजार ६८० दुचाकीस्वारांवर हेल्मेट कारवाई झाली. तसेच, सिग्नल मोडणाऱ्या ७२ हजार वाहनचालकांवर कारवाई केली आहे. सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर किंवा त्या पुढे थांबणाऱ्या ३६ हजार ६६ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. ही कारवाई आणखी वाढवली जाणार असून, बेशिस्ताना शिस्त लावण्याचा प्रयत्न होत आहे.