पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या, रामायणातील व्यक्तिरेखा असलेल्या ‘जब वी मेट’ नाटकावरून वादंग निर्माण झाल्यानंतर विद्यापीठाने याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच सत्यशाेधन समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ प्रवीण भोळे यांच्यासहित अन्य विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी याचा तीव्र निषेध केला आहे.
ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी रामायणातील व्यक्तिरेखा असलेले नाटक सादर केले. त्यानंतर गोंधळाचे नाट्य रंगले आहे. नाटक बंद पाडत विद्यार्थांना मारहाण, ललित केंद्राच्या विभागप्रमुखांसह विद्यार्थ्यांना अटक, विद्यार्थी संघटनांचे निवेदन, विद्यापीठाचे जाहीर प्रकटन, संघटनांचे मोर्चे अशा घटनांमुळे हा विषय चर्चेच राहिला आहे.
विद्यापीठाने यावर आपली भूमिका निवेदनाद्वारे मांडली आहे, ‘ललित कला केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या अंतर्गत प्रात्यक्षिक परिक्षेचा भाग म्हणून प्रायोगिक नाटकाचे सादरीकरण केले जात होते. त्याच्या सादरीकरणातील काही आशय, वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे. विद्यापीठामधील कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये ही विद्यापीठाची भूमिका आहे. या घटनेमुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याबाबत विद्यापीठाकडे विविध संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. कोणत्याही व्यक्तीचे, महापुरुषाचे तसेच ऐतिहासिक व्यक्तीचे विडंबन करणे हे पूर्णतः गैर असून निषेधार्ह आहे. विद्यापीठ अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करीत नाही. यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर विद्यापीठ दिलगिरी व्यक्त करीत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
सत्यशाेधन समिती स्थापन करणार
विद्यापीठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती गठित केली आहे. तिचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भात नियमानुसार आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक, विद्यार्थांना पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाकडून या सर्वांना जामीन देण्यात आला आहे.
राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया
केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी सायंकाळी सादर केलेल्या नाटकातील संवादांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि प्रयोग उधळून लावला. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. पाेलिसांनी भाेळे यांच्यासह विद्यार्थ्यांना ताब्यात घेत कारवाई केली. यावर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही कलाकार, रसिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, प्राध्यापक यांनी नाटक बंद पाडल्याबद्दल आणि गुन्हे दाखल केल्याचा तीव्र निषेध केला.