रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने वाचला प्रवाशाचा जीव (फोटो सौजन्य - iStock)
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा दलाचे आयुक्त यांच्या नेतृत्वात एका मोहिमेदरम्यान रेल्वेगाडीत चढण्याच्या प्रयत्नात प्रवासी फलाटाखाली पडला. त्यावेळी फलाटावर उपस्थित रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्याने त्या प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. या घटनेने रेल्वे पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र. ३ वर रेल्वे सुरक्षा दलाचे शिपाई ख्यालीराम खोखर गस्त घालत होते. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फलाट क्र. ३ वर आझाद हिंद एक्सप्रेस आली आणि ५.१० वाजता स्थानकावरून निघू लागली. त्याचवेळी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एका वृद्ध प्रवाशाचा तोल गेला. तेव्हा ते ए-१ कोचजवळ ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकले. यावेळी ते कसेतरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागले.
दरम्यान, ही बाब पोलिस शिपाई खोखर यांच्या लक्षात आली. त्यांनी सतर्कता, शौर्य आणि जलद कृतीने धाव घेत प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर व्यवस्थापकाने ट्रेन थांबविली. सदर वृद्ध चहा घेण्यासाठी खाली उतरले होते.
सुदैवाने, पोलिस शिपायाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली. मात्र, त्यांनी प्रवास सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ५.१३ वाजता त्यांना त्यांच्या डब्यात सुरक्षितरित्या बसवून गाडी रवाना करण्यात आली. हा संपूर्ण थरार गोंदिया स्थानकावर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या धाडसी कृत्याचे कौतुक करताना विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपककुमार यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्रत्येक परिस्थितीत प्रवाशांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे सांगितले.
चालत्या गाडीत चढणे व उतरणे टाळा
विभागीय सुरक्षा अधिकारी आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी शिपाई ख्यालीराम खोखर यांनी दाखविलेले शौर्य, समर्पण आणि तत्पर कृती कौतुकास्पद असल्याचे सांगितले. रेल्वे सुरक्षा दल केवळ रेल्वे मालमत्तेचे रक्षण करत नाही तर प्रवाशांच्या जीवाचे रक्षण करण्यासही सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रवाशांचे जीवन मौल्यवान आहे. चालत्या गाडीत चढण्याचा किवा उतरण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन करण्यात आले.