ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : सलग तीन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने ठाणे शहरात अक्षरशः हाहाकार माजवला होता. शहरातील रस्ते पाण्याखाली गेले, गाड्या ठप्प झाल्या, घरांमध्ये गटाराचं पाणी शिरलं, झाडं कोसळून रस्ते अडले, त्याचबरोबर भिंती कोसळून जीवघेणे प्रसंग निर्माण झाले होते. अवघ्या तीन दिवसांत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तब्बल 167 मदतीसाठी फोन खणखणले. मात्र संकटाच्या या काळात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिवस-रात्र सज्ज राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कामगिरी बजावली.
गेले काही दिवस सततच्या सुुरु असलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अशी घटना पुन्हा होऊ शकते ही बाब लक्षात घेत पालिकेने आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन विभागाकडून सुरक्षा तैनात करण्यात येत आहे. 18,19 आणि 20ऑगस्ट या तीन दिवसांत आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तब्बल167 तक्रारी प्राप्त झाल्या. यात झाडं कोसळण्याच्या घटना सर्वाधिक होत्या.61 झाडं कोसळली, 15 फांद्या तुटल्या, 9 झाडं धोकादायक अवस्थेत असल्याचे निदर्शनास आलं, तर एका प्रकरणात धोकादायक फांदी आढळली. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यामुळे 57 ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिक त्रस्त झाले.पावसाच्या जोरदार तडाख्याने 2 घरांच्या भिंती कोसळल्या,3 कंपाउंड वॉल ढासळल्या, नाल्याची भिंत कोसळली, एका ठिकाणी भूस्खलन झाले, लोखंडी शेड कोसळले. एवढ्यावरच न थांबता 4 आगीचे अपघात आणि प्लास्टर कोसळण्याचे प्रकरणही घडले. या सर्व तक्रारींवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तात्काळ प्रतिसाद दिला.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली टीडीआरएफ, आर डी एम सी टीम, अग्निशमन दल, अभियंते, वृक्षप्राधिकरण विभाग, आरोग्य विभाग,घन कचरा विभाग, वाहतूक विभाग या सर्वांशी समन्वय साधून मदतकार्य राबवण्यात आलं. याचबरोबर महापालिकेच्या विविध विभागांनी नागरिकांशी संपर्क ठेवत, तक्रारींचं निवारण होईपर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळे नागरिकांमध्येही प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण झाला. पावसाचा प्रकोप काहीसा कमी झाला असला तरी प्रशासन अजूनही सज्ज आहे.धोकादायक इमारती, धोकादायक झाडं, धोकादायक भिंती यांची त्वरित माहिती द्यावी, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी आणि कोणतीही आपत्ती उद्भवल्यास तातडीने हेल्पलाईनवर संपर्क साधावा. ठाणे शहराच्या नागरिकांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग नेहमी सज्ज आहे, असं यासीन एम. तडवी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ठाणे महापालिका यांनी सांगितलं आहे.