राहुल द्रविड आणि रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Rahul Dravid praises Rohit Sharma : आशिया कप २०२५ साठी काही दिवसांपूर्वी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवला संघाचे कर्णधार तर शुभमन गिलल उपकर्णधार बनवण्यात आले आहे. यावेळी आशिया कप २०२५ टी २० स्वरूपात खेळला जाणार आहे. यावेळी भारतीय संघात अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार नाहीत. कारण, या दोन्ही दिग्गजांनी टी २० क्रिकेटमधून आधीच निवृत्ती जाहीर केली आहे. आताच्या आशिया कपसाठी नवीन संघ असणार आहे. या दरम्यान द वॉल राहुल द्रविडने रोहित शर्माचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की, विराट कोहलीचे कर्णधारपद काढून टाकल्यानंतर रोहित शर्माने कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माचे नाव जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये गणले जाते. १ वर्षापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विजेतेपद पटकावले होते. तेव्हा राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक होता. अलीकडेच, राहुल द्रविडने एका मुलाखतीदरम्यान रोहित शर्मावर भाष्य केले आहे. विराटनंतर टीम इंडियाला रोहितसारख्या कर्णधाराची नितांत आवश्यकता हिती असे विधान राहुल द्रविडने केले आहे.
राहुल द्रविड भारतीय माजी अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या ‘कुट्टी स्टोरीज’ या यूट्यूब चॅनल शोमध्ये दिसून आला. या दरम्यान त्याने टीम इंडिया आणि त्याच्या खेळाडूंबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. रोहित शर्माबद्दल विधान करताना राहुल द्रविडने म्हटले की, “रोहित शर्मा त्याच्या संघाबाबत खूप विचार करतो. पहिल्या दिवसापासूनच त्याला माहित होते की संघ कसा चालवायचा आहे आणि त्याच्यासाठी नेमकं काय महत्त्वाचे आहे.”
राहुल द्रविड पुढे म्हणाला की, “तो नेहमीच असा विश्वास ठेवतो की नेहमीच एका कर्णधाराची टीम असायला हवी, संघ कसा चालवायचा आणि खेळाडूंना कोणत्या मार्गावर घेऊन जायचे हे कर्णधाराने ठरवायचे असते. म्हणून, कर्णधाराला पाठिंबा दिला गेला पाहिजे. मी असे म्हणू इच्छितो की त्याच्यासोबत काम करणे खूप आनंददायी असे होते. आम्ही कधीकधी मोठी आव्हाने देखील पाहिली आहेत, परंतु रोहित त्याच्या कामावर खूप आनंदी दिसून आला होता.”
राहुल द्रविडला असा विश्वास वाटतो की, रोहित शर्मा हा खूप मृदू स्वभावाचा व्यक्ती असून तो संघाला खूप चांगले समजून घेत असे. विराट कोहली गेल्यानंतर टीम इंडियाला रोहित शर्मासारख्या कर्णधाराची खूप गरज होती. रोहितने टीम इंडियाचे खूप चांगले नेतृत्व केले असून त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या कामगिरीवर मी आनंदी आहे.