Gokul Milk Politics
कोल्हापूर/ दीपक घाटगे : गोकुळच्या थंड असलेल्या दुधाला अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून उकळी फुटली असून, दूध संघातील राजकारण चांगलेच तप्त झाले आहे. बंडाचा झेंडा उभा करणाऱ्या अरुण डोंगळे यांना मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील कसे थंड करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर सलग २५ वर्ष सत्ता आबाधित ठेवणाऱ्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे असणारे वर्चस्व नेस्तनाबूत करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी शाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. व सत्ता आपल्याकडे खेचली. या निवडणुकीत विरोधी महाडिक गटाच्या शौमिका महाडिक या महिला प्रतिनिधी म्हणून एकमेव निवडून आल्या. आघाडीच्या ठरलेल्या धोरणानुसार पहिले अडीच वर्ष ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना अध्यक्ष करण्यात आले, तर त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. पुन्हा अध्यक्षपदासाठी संचालक अरुणकुमार डोंगळेना संधी देऊन या पदावर विराजमान करण्यात आले. १४ मे रोजी त्यांचा कार्यकळ संपत असताना त्यांनी या पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र कुठेतरी माशी शिंकली आणि अरुण डोंगळे यांनी या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे ‘गोकुळ’च्या थंड दुधाला चांगलीच उकळी फुटली आहे.
गोकुळमध्ये सत्ता गेल्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, संचालिका शौमिका महाडिक यांनी एकही संधी अशी सोडलेली नाही. प्रत्येक वेळी विद्यमान संचालकावर टीकेची तोफ झाडली आहे. त्यामुळे गोकुळची सत्ता सूत्रे पुन्हा महाडिकांच्या हातात यावीत, यासाठी त्यांची जोरदार धडपड सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेापाने वाढली उत्कंठा
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अरूण डोंगळे यांना राजीनामा देऊ नका. पुढील अध्यक्ष महायुतीचा असेल असा आदेश दिल्याने त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. या घडामाेडीने आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तातडीने संचालकांची बैठक बोलावून घेतली. डोंगळे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत बैठकीत संचालकांनी चर्चा करून २१ संचालकापैकी १९ जणांनी डोंगळे यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे डोंगळे एकाकी पडल्याचे दिसून आले. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केला असेल तर काहीतरी घडणार, अशी चर्चा रंगली आहे.
आगामी राजकारणावर हाेणार माेठा परिणाम
गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात सर्व संचालकांनी एकत्र येऊन अरुण डोंगळे यांना आव्हान दिले असून, गोकुळ शिरगाव येथील मासिक बैठकीतही त्यांच्यासोबत संचालक दिसून आलेले नाहीत. त्यामुळे डोंगळे एकाकी पडले असल्याचे दिसत आहे. अनेक नेते या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असून, दोन दिवसांत डोंगळे राजीनामा देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डोंगळे यांनी केलेल्या बंडामुळे ‘गोकुळ’च्या आगामी राजकारणावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, पुढील काही दिवसांत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.
महायुतीचा अध्यक्षच होईल – महाडिक
डोंगळे यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण महायुतीचा अध्यक्षच होईल, असे भाकीत खासदार धनंजय महाडिक यांनी केल्याने गोकुळचे हे राजकारण कुठल्या वळणावर पोहोचणार हे पहावे लागणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासात असे कधीही झालेले नाही. ठरलेल्या मुदतीत अनेकांनी राजीनामे दिले आहेत. पण एकमेव उदाहरण डोंगळे यांच्याबद्दल आहे. त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला, हे सुद्धा त्यांचे मोठे धाडस आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे मोठ्या राजकीय शक्तीचे पाठबळ आहे, असे दिसून येते.