कोल्हापूरच्या सहकार राजकारणात नवा पेच; गोकुळची राजकीय समीकरणे ढवळून निघाली
कोल्हापूर/दीपक घाटगे : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि प्रभावी दूध संघटना म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ( गोकुळ ) संघाच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष व प्रभावशाली सहकारी नेते अरुणकुमार डोंगळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे गोकुळच्या पुढील निवडणुकीचे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून कोल्हापूरच्या सहकार राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे.
डोंगळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार राजकारणातील महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांच्या निर्णयांचा गोकुळसह जिल्ह्यातील साखर कारखाने, दूध संघ आणि स्थानिक निवडणुकांवर लक्षणीय परिणाम होत असतो. आजवर त्यांनी अनेकवेळा राजकीय भूमिका बदलून आपली ताकद दाखवून दिली आहे. कधी शिवसेना शिंदे गटाशी सलगी केली, तर कधी भाजपसोबत जवळीक साधली. मात्र आता त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती देत प्रवेश केला आहे.
अरुणकुमार डोंगळे यांच्या प्रवेशाने कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा आधार मिळाला आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. डोंगळे यांची सहकारी क्षेत्रातील पकड लक्षात घेता हा प्रवेश पक्षासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो, असे स्थानिक पातळीवर मत व्यक्त होत आहे.
गोकुळ दूध संघाचे राजकारण केवळ सहकारापुरते मर्यादित नसून त्याचे थेट परिणाम जिल्ह्यातील विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांवर होतात. मोठ्या प्रमाणावर गोकुळचे शेतकरी सभासद एकाच वेळी राजकीय ताकद निर्माण करतात. त्यामुळे डोंगळे यांच्या राजकीय हालचालींनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
एकंदरीत, डोंगळे यांच्या प्रवेशाने गोकुळ आणि कोल्हापूरच्या सहकार राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे. भाजप व शिंदे गटाची पकड सैल होताना दिसत असून, अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे गोकुळमध्ये बळ मिळेल. त्यामुळे गोकुळच्या पुढील सत्तासमीकरणाचे नवे चित्र आता रंगवले जाईल.
विरोधी गट एकत्र येण्याची शक्यता
भाजपसोबत सलगी करून डोंगळे यांनी पूर्वी सत्ता टिकवून ठेवली होती. तर काही काळ त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांसोबत जवळीक साधून गोकुळच्या घडामोडींवर प्रभाव ठेवला होता. परंतु अजित पवार यांच्याशी वाढवलेली जवळीक आता स्पष्ट राजकीय निर्णयात परिवर्तित झाली आहे. पुढील गोकुळ निवडणुकीत डोंगळे यांच्या या निर्णयामुळे अजित पवार गट मजबूत होणार असला तरी विरोधी गट एकत्र येऊन आव्हान निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात गोकुळच्या निवडणुका आणखी रंगतदार होणार हे निश्चित आहे.
चेअरमनपदावरुन घडल्या नाट्यमय घडामाेडी
गोकुळच्या चेअरमन पदाचा कार्यकाल संपल्यानंतर अरुण कुमार डोंगळे यांनी ठरलेल्या सूत्रानुसार या पदाचा राजीनामा देणे अपेक्षित असताना राज्यस्तरावर घडामोडी घडल्या आणि त्यांनी राजीनामा देण्यास दीर्घ काळ लावला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी राजीनामा देऊ नये असे सांगितले. यावेळी नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि नविद मुश्रीफांच्या रूपाने महायुतीचा चेअरमन गोकुळच्या संस्थेवर विराजमान झाला.
अजित पवार गटाची ताकद वाढणार
गेल्या काही वर्षांत गोकुळमध्ये वेगवेगळ्या गटांतून सत्ता बदल होत आहेत. या सत्तांतरामागे डोंगळे यांचे धोरणात्मक पाऊल महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे त्यांचा कोणत्या पक्षाशी संपर्क आहे. यावर गोकुळच्या राजकारणाची दिशा ठरते. त्यांच्या या नव्या प्रवेशामुळे गोकुळच्या निवडणुकीत अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितच वाढणार आहे.