Rajgad Fort : पुण्यातील राजगड किल्ल्यावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; काहींची प्रकृती गंभीर
पुणे : किल्ले राजगड (ता. राजगड) येथील बालेकिल्ल्याजवळ झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचवीस ते तीस पर्यटक किरकोळ जखमी झाले तर बारामती मधील पर्यटकांमुळे तीन पर्यटकांना वेळीच मदत मिळल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना रविवारी (दि. १३) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास किल्ले राजगडावर घडली.
सलग सुट्ट्यामुळे किल्ले राजगडावर पर्यटकांची मोठी वर्दळ होती. सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास बाले किल्ल्याजवळील असलेले मधमाशांचे पोळे उठल्याने येथील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये सुमारे 25 ते 30 पर्यटक किरकोळ जखमी झाले. गडावरती एकच गोंधळ निर्माण झाला. यामध्ये काही पर्यटकांनी स्वतःला वाचवण्यासाठी किल्ल्यावरती धावाधाव केली तर काही पर्यटकांनी गडावर असलेल्या पद्मावती तळ्यामध्ये उड्या घेतल्या. मधमाशांनी चावा घेतल्यामुळे गडावरील पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे व विशाल पिलावरे यांनी पर्यटकांना सूचना करत काही पर्यटकांना पुरातत्व विभागाच्या कार्यालयामध्ये आसरा दिला.
जीव वाचवण्याच्या आकांताने काही पर्यटक गडाच्या खाली पळाले त्यामध्ये मुंबईवरून आलेल्या तीन जणांच्या ग्रुपमधील प्रथम अहिरे (वय-२४) अंधेरी वेस्ट मुंबई या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने तो जखमी झाला होता. तो ओरडत जीव वाचवण्यासाठी गड उतरू लागला. दरम्यान तो दोन ते तीन ठिकाणी तोल जाऊन घसरला. किल्ला अर्धा उतरल्यानंतर त्याला उलटीचा त्रास होऊ लागला. व चक्कर येऊ लागली.
दरम्यान गडावर जात असलेल्या बारामती येथील रणजीत बिचकुले, मारुती वाघमारे, योगेश मलगुंडे, अनिकेत मलगुंडे, स्वप्निल खरात या तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखत गडावर न जाण्याचा निर्णय घेत प्रथम अहिरे व इतर गडावरून आलेल्या पर्यटकांच्या अंगावरील मधमाशांचे काटे काढून त्यांस पाणी दिले. व प्रथम अहिरे यास एकमेकांनी पकडून मदत करत गडावरून खाली आणून किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साखर गावामध्ये खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी येथील प्राथमिक शिक्षक संतोष उत्तरकर यांनी त्यांना मदत केली. दरम्यान त्याच्यासोबत असणारे दोन पर्यटक विशाल गायकवाड व शुभम खरे दोघेही राहणार अंधेरी वेस्ट मुंबई यांनी मधमाशांपासून जीव वाचवण्यासाठी झाडांमध्ये उडी मारली असल्याची माहिती प्रथम अहिरे यांनी बारामतीतील पर्यटकांना दिल्यानंतर गडावरती संपर्क करण्यात आला.
नंतर पुरातत्व विभागाचे बापू साबळे व पिलावरे यांनी गुंजवणे येथील पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ यांच्याशी संपर्क केला, रसाळ यांनी शांताराम उर्फ मंगेश भोसले यांना गडाच्या दिशेने पाठवले. दरम्यान चोर दरवाज्याच्या दरीमध्ये विशाल गायकवाड व शुभम खरे अडकले होते त्यांना वर काढण्यात आले.