बारामतीत वाहतुकीची कोंडी वाढली; बेशिस्त वाहनचालकांमुळे समस्या गंभीर
बारामती : बारामती शहर हे औद्योगिक, शैक्षणिक व कृषी दृष्ट्या महत्त्वाचे ठरत असले तरी गेल्या काही वर्षांत शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढलेली वाहनसंख्या ही मोठी समस्या ठरत आहे. शहरात दररोज हजारो वाहने धावतात. अंदाजे १ लाखांहून अधिक दुचाकी, २५ हजारांपेक्षा जास्त चारचाकी तसेच ट्रक, बस, मालवाहू वाहने आणि ऑटो यामुळे शहरातील रस्ते क्षमतेपेक्षा अधिक भार सहन करत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे बारामती शहरातील विविध रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
वाहतुकीतील शिस्त हीच सर्वात मोठी गरज असताना बऱ्याच वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन वारंवार होत असल्याचे दिसून येते. मुख्य बाजारपेठेत रस्त्यामध्ये चार चाकी वाहने उभी करणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे, अशा प्रकारांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये वारंवार कोंडी निर्माण होते. शाळा–कॉलेज सुटण्याच्या वेळेस, बाजारपेठ परिसरात तसेच औद्योगिक वसाहतीच्या मार्गांवर वाहतूक ठप्प होणे ही रोजची बाब झाली आहे.
पोलिसांकडून विविध उपयोजना सुरू
वाहतूक पोलीस विभागाकडून वेळोवेळी मोहिमा राबवण्यात येतात. नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच महत्त्वाच्या चौकांवर अतिरिक्त पोलीस तैनात करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न होतो. मात्र, वाहनांच्या झपाट्याने वाढत्या संख्येमुळे आणि नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे या उपाययोजनांना फारसा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. बारामती शहर वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बेशिस्त वाहन चालकांवर गेल्या अनेक दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे, यामध्ये मोठ्या आवाजात सायलेन्सर लावणाऱ्या दुचाकींवर कारवाई करून सदर सायलेन्सर जप्त करून त्याच्यावर रोलर फिरवण्यात आला, त्याचबरोबर फुटपाथावर दुचाकी लावणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली. बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्यांवर देखील कारवाई केली. त्याचा चांगला परिणाम शहरांमधील वाहतुकीवर दिसून आला, मात्र काही दिवसानंतर पुन्हा बेशिस्त वाहन चालकांकडून नियमांचे पालन व्यवस्थित केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
नवीन वाहन तळाची आवश्यकता
बारामती शहरातील सिनेमा रोड, स्टेशन रोड, मारवाड पेठ या ठिकाणी वारंवार अनेक वाहन चालक चारचाकी वाहने रस्त्यात उभी करतात, त्यामुळे इतर वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बारामती शहरात जुनी मंडळी या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी वाहनतळ गेल्या अनेक वर्षांपासून बांधण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी कोणीही वाहने पार्क करत नाहीत. वास्तव पाहता बारामती शहरातील मुख्य चौक असलेल्या भिगवण चौकालगत नवीन वाहन तळाची आवश्यकता आहे. सध्या चारचाकी वाहनांचे पार्किंग शारदा प्रांगणात केले जाते, तर काहीजण मुख्य रस्त्याच्या बाजूला वाहने पार्किंग करतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिल्यास दिलासा
नागरिकांच्या मते, शहरात पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था, पर्यायी रस्त्यांची निर्मिती, सिग्नल व्यवस्थेत सुधारणा आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिल्यास या समस्येत काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. तसेच नागरिकांनी स्वअनुशासन पाळून नियमांचे काटेकोर पालन करणे हीच खरी गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. बारामतीसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरासाठी सुयोग्य वाहतूक व्यवस्थापन हा काळाचा महत्त्वाचा मुद्दा ठरला असून प्रशासन व नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.