Trustees complain that adulterated Bhandara has arrived at Jejuri Martand Bhairav Khandoba Temple
जेजुरी : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री मार्तंड भैरव अर्थात जेजुरीतील खंडोबाच्या मंदिरामध्ये भंडाऱ्याची मुक्त उधळण केली जाते. भंडारा आणि खोबऱ्याचा प्रसाद चढवला जातो. मोठ्या भक्तीभावाने भाविक भंडारा उधळत असतात. यामुळे संपूर्ण जेजुरी गडावर भंडाऱ्यात न्हावून निघालेला असतो. यामुळे सोन्याची जेजुरी देखील म्हटले जाते. मात्र आता जेजुरीवरील भंडाऱ्यामध्ये भेसळ असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. जेजुरीचा भंडारा हा भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेले महाराष्ट्रातील प्रत्येक जोडपे हे जेजुरीवर दर्शनासाठी येत असते. त्याचबरोबर भंडारा घरी घेऊन जाऊन त्याचा वर्षभर वापर करत असतात आणि त्याची पूजा करत असतात.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भंडाऱ्याची मुक्त उधळून होणाऱ्या जेजुरी गडावरील भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिवळा भंडारा आता जेजुरीतील भाविकांच्या व स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक असणाऱ्या गडाच्या तटबंदीवर देखील याचा विपरित परिणाम होत आहे. जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग, त्वचेची आग होणे, डोळे चुरचुरणे असे परिणाम होत आहे. मागील काही वर्षापूर्वी याबाबत पुरातत्व विभागाने देखील अहवाल सादर केला होता. तसेच निर्बंध घालण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. आता याबाबत जेजुरीतील मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच शासनाकडून यावर कडक निर्बंध घालण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
जेजुरी गडावरील भेसळयुक्त भंडाऱ्याबाबत शिवराज झगडे म्हणाले की, “बाहेरील व्यापारी जेजुरी मंदिर परिसरात व गडावर भेसळयुक्त भंडारा विकत आहेत. टर्मरिक पावडर, यल्लो पावडर, नॉन एडिबल पावडर असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्रीस आणल्या जात आहेत, या पावडरची सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना त्याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांना, नियमित वारकऱ्यांना या पावडरचा त्रास होत आहे, अशी तक्रार विश्वस्त शिवराज झगडे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “याबाबत आम्ही शुक्रवारी (28 मार्च) अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. आम्ही त्यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिलं आहे, आम्ही म्ही मंत्री नरहरी झिरवाळ यांना भेटून त्यांना आवाहन केलं आहे की जेजुरीत विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करावी. अन्न व औषध प्रशासनाने या भंडाऱ्यावर प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करावी.” अशी मागणी मार्तंड देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे. त्यामुळे जेजुरीमध्ये जाणाऱ्या भाविकांनी भंडारा घेताना सतर्कता दाखवण्याची गरज आहे.