संग्रहित फोटो
पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली आहे. अरुण शंकर जोशी (वय ६०, रा. विवेकश्री बिल्डींग, राजेंद्रनगर, सदाशिव पेठ) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंकिता अनिल जोशी (वय २१, रा. विवेकश्री बिल्डींग, राजेंद्रनगर, सदाशिव पेठ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अरुण जोशी २२ मार्च रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास डेक्कन जिमखाना परिसरातील बीएमसीसी महाविद्यालय रस्त्याने निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोशी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. परंतु, पसार झालेल्या वाहनचालकांचा शोध घेतला जात होता. अपघात नेमका कसा झाला, तसेच जोशी डेक्कन भागात कोणाकडे गेले होते, याबाबतची माहिती उपलब्ध झाली नाही. अपघातानंतर आठ दिवसांनी जोशी कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास हे उपनिरीक्षक कुलकर्णी करत आहेत.
हायड्राक्रेनच्या धडकेने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
हायड्राक्रेन वाहनाच्या धडकेने एका ८० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच विलेपार्ले परिसरात घडली आहे. बिना अनिल मथुरे असे या मृत वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी क्रेन चालक अरविंद कमलेश यादव याच्याविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर अरविंद हा घटनास्थळाहून पळून गेला होता. रात्री शुक्रवारी उशिरा त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजता विलेपार्ले येथील इर्ला मार्केट, तानाजी मालुसरे मार्ग, प्राईम मॉलसमोर झाला आहे. बिना मथुरे या महिला विलेपार्ले येथील पोस्ट ऑफिसजवळील गणेश मूर्ती गार्डन शोरुमजवळ राहते. गुरुवारी दुपारी त्या इर्ला मार्केटमध्ये गेल्या होत्या. प्राईम म शोरुमसमोरुन जात असताना एका हायड्राक्रेन चालकाने हलगर्जीपणाने गाडी चालवून बिना यांना जोरात धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर क्रेनचालकाने जखमी महिलेस कुठलीही वैद्यकीय मदत केली नाही.