संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
Tukaram Mundhe on Sanjay Raut : अन्न व औषध प्रशासनातील कथित भ्रष्टाचारावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खासदार संजय राऊत यांनी FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं कौतुक करतानाच त्यांच्याच विभागातील कथित गैरप्रकारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आता या आरोपांवर तुकाराम मुंढे यांनी थेट भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी FDA च्या कारवाईबाबत बोलताना ‘मुंढे इफेक्ट’ हॉटेलच्या किचनपुरता मर्यादित न राहता FDA च्या कार्यालयातही दिसायला हवा, असं म्हटलं होतं. तसेच विभागातील अधिकाऱ्यांकडून कथितपणे सुरू असलेल्या पैशांच्या मागणीबाबत आपल्याकडे माहिती असल्याचं सांगत राऊतांनी मुंढेंना पत्र दिल्याचा दावाही केला होता.
मात्र, तुकाराम मुंढे यांनी आपल्याला संजय राऊतांचं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं स्पष्ट केलं. माध्यमांमध्ये आलेली माहिती आपण वाचली असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच राऊतांनी काही ठोस माहिती किंवा पुरावे दिले तर त्यावर निश्चितपणे कारवाई करता येईल, असंही मुंढे म्हणाले.
“मला त्यांच्या पत्राची कोणतीही प्रत मिळालेली नाही. मी जे काही आहे ते प्रसारमाध्यमांवर वाचलं आहे. त्यांनी माझ्याकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांच्याकडे असलेला तपशील द्यावा,” असं आवाहन मुंढेंनी केलं.
तसंच, ज्या परवानाधारकांकडे पैशांची मागणी झाली असेल किंवा ज्यांनी पैसे दिले असतील, त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असंही त्यांनी सांगितलं. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाते, त्यामुळे कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही, अशी भूमिका मुंढेंनी मांडली.
“मला दुसरं काही नको, मला फक्त पुराव्याची गरज आहे,” असं म्हणत तुकाराम मुंढेंनी कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे आता संजय राऊतांकडे नेमके कोणते पुरावे आहेत आणि ते पुढे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, FDA मधील कथित गैरप्रकारांच्या आरोपांवरून सुरू झालेल्या या चर्चेला तुकाराम मुंढेंच्या प्रतिक्रियेमुळे नवं वळण मिळालं आहे.
Rohit Pawar : …तर समृद्धी महामार्ग जाम करू, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा






