किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दल आक्रमक, अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून राडा
Navi Mumbai News : अल्पवयीन मुलीशी संबंधित एका प्रकरणावरून नवी मुंबईतील रबाळे परिसरात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणात कारवाईची मागणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या रबाळे पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र, त्यांच्या उपस्थितीला बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध करत घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
उपलब्ध वृत्तानुसार, अल्पवयीन मुलीला एका प्रौढ व्यक्तीने पळवून नेल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, मुलीच्या पालकांनी मुलीला सुरक्षितपणे परत आणावे आणि संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात आल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणाचा आम्ही आधीपासून पाठपुरावा करत असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. सोमय्या फुकटचे श्रेय घेण्यासाठी आल्याचा आरोपही त्यांनी केला.
Rohit Pawar : …तर समृद्धी महामार्ग जाम करू, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा
तसेच पोलीस ठाण्याबाहेरून कार्यकर्त्यांना हटवण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांचा निषेध केला. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वादाचे वातावरण निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
दुसरीकडे, या प्रकरणात दोषी व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडली. अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह एक टीम तयार करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या सगळ्या प्रकारात मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. मुलीला सुरक्षितपणे परत आणावे आणि संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. प्रकरणाचा तपास सुरू असल्याने पुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.






