लोकसभा (Loksabha ) निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्यातील नेत्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. जळगाव मध्ये शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंवर संकट आल्यानंतर त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन, असे नरेंद्र मोदी आपल्या सभेत म्हणाले होते. त्यावर बोलताना शरद पवार(Sharad Pawar ) म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली त्या काळात तुम्ही त्यांची विचारपूरस केली होती. मोदी याबद्दल लाख बोलतील पण आमची प्रार्थाना आहे की उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदी यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये, असे विधान शरद पवारांनी केले.
नरेंद्र मोदींबद्दल असणारी लोकांमधील आस्था कमी होताना दिसत आहे. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पण त्या कधी कृत्यामध्ये उतरल्या नाहीत. त्यांचा स्वभाव बेछूटपणे बोलण्याचा आहे. मग ती गोष्ट झेपेल की नाही, सरकारची आर्थिक स्थिती काय आहे? याबद्दल यत्किचिंतही विचार न करता ते अनेक गोष्टी कबूल करतात. नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये जनतेसमोर अनेक गोष्टी मांडल्या. तसेच त्यांनी मनमोहन सिंग यांच्या निर्णयावर टीका देखील केली. पण तेच निर्णय आज नरेंद्र मोदी स्वतः राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विरोधाभास लोकांना दिसत आहे. त्यामुळे सगळ्यांमध्ये नाराजी असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
नरेंद्र मोदींनी कुटुंब संभाळलं आहे का? शरद पवार
डॉ. मनमोहन सिंग हे शांतपणे आणि कुठलाही गाजावाजा न करता काम करायचे आणि जनतेसमोर रिझल्ट द्याचे. मोदीसाहेब रिझल्ट देतात की नाही हे माहित नाही. पण त्याच्यावर चर्चा टिप्पणी करण्यासाठी वेळ जातो. ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली आहे. जो या वयात कुटुंब संभाळू शकत नाही तो महाराष्ट्र काय सांभाळणार, अशी टीका मोदींनी शरद पवारांवर केली होती. त्याला उत्तर देत शरद पवार म्हणाले, मोदींनी कुठे कुटुंब सांभाळलं आहे का? मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक आहे. पण मी त्या लेव्हलाला जाऊन बोलणार नाही. आपण कोणाबद्दल असं व्यक्तिगत बोलू नये. ते पथ्य मोदींनी पाळलं नाही म्हणून आपणही नाही पाळायचं,असे वागणे योग्य नाही, असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
देशाचा पंतप्रधान कोटी वेळा महाराष्ट्रामध्ये येतोय. या आधी कोणत्याही पंतप्रधानाला महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळा येताना पाहिलं नाही. मोदींचा हा तिसरा-चौथा राऊंड आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांना विजयाबद्दल कॉन्फिडन्स नाही. त्यामुळे मोदींना पुन्हा पुन्हा राज्यात यावे लागत आहे, असे म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.