
पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे शासनाचे निर्देश
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे अवर सचिव कविता देसाई यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत धाराशिव उपसा सिंचन योजना क्रमांक २, टप्पा क्रमांक १ अंतर्गत मोहोळ तालुक्यातील घाटणे बॅरेज येथे पाणी साठवण करण्याबाबत हे पत्र आहे.
धाराशिव जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला असून, जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मानवासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे शासनाने अधोरेखित केले आहे.
Ujani Dam Water Stock 2026: कोण पळवू पाहतंय उजनीचं पाणी? सोलापूरची जीवनवाहिनी धोक्यात
उजनीचे पाणी घाटणे बॅरेजमध्ये; पुढील प्रवास धाराशिवच्या तहानलेल्या गावांसाठी
उजनी जलाशयातील पाणी उपलब्ध करून ते सिना नदीवरील घाटणे बॅरेज येथे साठविण्याची व्यवस्था करावी. त्यानंतर कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक २ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील आवश्यक साठवण तलावांमध्ये हे पाणी उपलब्ध करून द्यावे, असा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून १ टीएमसी पाणी देण्याची मागणी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, उजनी धरणापासून घाटणे बॅरेजपर्यंत आणि पुढे धाराशिव जिल्ह्यातील विविध साठवण तलावांपर्यंत पाणी पोहोचविताना होणारी गळती, बाष्पीभवन आणि अन्य कारणांमुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यावर शासनाने भर दिला आहे.
प्रवासातील अंतर आणि बाष्पीभवनामुळे पाण्याची नासाडी होऊ नये, यासाठी घाटणे बॅरेजमध्ये नियोजित केलेल्या पाण्याच्या पुढील पिण्याच्या आवर्तनांसोबतच पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच घाटणे बॅरेजपासून रामदरा तलावापर्यंत कृष्णा-मराठवाडा लिंकच्या पाच टप्प्यांतील उपसा सिंचन प्रणालीद्वारे पाणी वाहून नेताना पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दुष्काळाच्या संकटात पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे जीवनाची आशा आहे. त्यामुळे केवळ पाणी उपलब्ध करून देणे नव्हे, तर ते योग्य नियोजनातून लाभार्थी गावांपर्यंत पोहोचविणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
एकीकडे पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, तर दुसरीकडे उजनीच्या पाण्याकडे जिल्हावासीयांच्या आशेच्या नजरा लागल्या आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या या पत्रामुळे उजनीचे पाणी घाटणे बॅरेजमध्ये साठवून ते धाराशिवपर्यंत आणण्याच्या प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मात्र, १ टीएमसी पाणी प्रत्यक्ष उपलब्ध होणे, त्याचे काटेकोर नियोजन करणे आणि ते दुष्काळग्रस्त गावांपर्यंत वेळेत पोहोचविणे, हीच आता खरी कसोटी असणार आहे. कागदावरील नियोजन प्रत्यक्षात उतरून धाराशिवच्या तहानलेल्या भूमीला पाण्याचा दिलासा मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.