maharashtra politics of mahayuti
संगमनेर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. अद्याप निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला नसला तर दिवाळी नंतर निवडणूका असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने संगमनेरमध्ये इंदिरा गांधी महोत्सव सुरु केला आहे. कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये हा महोत्सव सुरु करण्यात आला आहे. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून येत आहे. महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महिलांचे मेळावे घेण्यास सुरुवात केल्यानंतर आता कॉंग्रेसने देखील महिला वर्गाचे महोत्सव सुरु केले आहेत.
नवरा सगळा पगार देतो तरी…
या महोत्सवावेळी कॉंग्रेस नेत्या व खासदार प्रणिती शिंदे यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली आहे. सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून योजनांवर देखील महायुतीला फटकारले आहे. सध्या महायुतीच्या लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. यावरुन बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “बाळासाहेब थोरात यांच्या शब्दापुढे मी जाऊ शकत नाही. संगमनेरला आल्यावर घरी आल्यासारखं वाटतं. मी आमदार, खासदार झाले मात्र महिलांसाठी एवढा मोठा कार्यक्रम मी सुद्धा करू शकले नाही. गृहिणी खूप हुशार आहेत. मात्र त्यांच्या उत्पादनांना मार्केट आता उभे राहिले आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला एकत्रित आल्या तर शक्तीपीठ निर्माण होतं. महायुती लाडकी बहीण सारख्या योजना आता सुरु करत आहेत. नवरा सगळा पगार देतो, त्याचं बायका ऐकत नाहीत. तर यांचं कोण ऐकणार?” असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच हास्यकल्लोळ झाला.
या सरकारने यातही पैसे खाल्ले
पुढे प्रणिती शिंदे यांनी राजकोट किल्ल्यावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयीच्या दुर्घटनेवरुन राज्य सरकारला धारेवर धरले. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “जे सरकार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करु शकतं त्यांच्याबाबत काय बोलणार? बदलापूरच्या घटनेतही लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं. अघोषित आणीबाणी निर्माण झाली आहे. निवडणूक व्हायला हवी होती. पण ती पण झालेली नाही. शिवाजी महाराजांचा निकृष्ट दर्जाचा उभारला होता. प्रताप गडावर पंडीत नेहरुंनी अनावरण केलेला पुतळा अद्यापही मजबूत आहे. मात्र आठ महिन्यांत राजकोटचा पुतळा कोसळला. कारण या सरकारने यातही पैसे खाल्ले” असा थेट गंभीर आरोप कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरु आहे.