नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील (Nagpur Central Jail) रुग्णालयात एका गतिमंद आरोपीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बुधवारी एका पोक्सोच्या (Pocso Act) प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असताना आरोपीने ही आपबिती सांगितली. न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तत्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे धंतोली पोलिसांना आदेश दिले आहे.
पीडित आरोपी हा गतिमंद आहे. तो एका पोक्सोच्या प्रकरणात आरोपी असून, सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. या पोक्सोच्या प्रकरणावर बुधवारी न्या. ओ. पी. जयस्वाल यांच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायालयाने त्यास ‘तुझी काही तक्रार आहे का?’ अशी विचारणा केली असता त्याने ही खळबळजनक आपबिती न्यायालयासमक्ष सांगितली.
कारागृहाच्या रुग्णालयात आरोपीला गोळ्या देताना रोहन नावाच्या एकाने त्याचे तोंड दाबून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. न्यायालयाने त्याचे म्हणणे ऐकून घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे धंतोली पोलिसांना आदेश दिले. याप्रकरणात मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला पूर्ण सहकार्य करायचे आहे. तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी व घटनेची चौकशी करून न्यायालयात अहवाल सादर करण्याचेही आदेशात स्पष्ट केले.






