तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल....; ठाकरेंच्या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळांचे सूचक विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय़ानंतर येत्या चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्ष अलर्ट मोडवर आले असून त्या दृष्टीने घडामोडीही सुरू झाल्या आहेत. राज्यतील पक्षांकडून युती आणि आघाड्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय समीकरणांची जुळवाजुळवही सुर झाली असून भेटीगाठी वाढल्य आहेत. या सगळ्यात महाविकास आघाडीमध्येही हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही भेट घेणे आवश्यक होते, असेही त्यांनी यावेळी नमुद केले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी भेट घेतली. आमच्यात एक चांगली चर्चा झाली. आपला महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे, यावर आम्ही चर्चा केली. महाराष्ट्र धर्म जगला तर देश जगेल, पण आज भाजपने देश आणि धर्म दोन्ही बुडवले आहेत.पण आता संघर्षाची वेळ आली आहे. भाजप लोकशाही बुडवायला निघाली आहे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे. अशा भावना सपकाळ यांनी व्यक्त केल्या.
सपकाळ म्हणाले, खासदार राहुल गांधी यांच्यावर मी एक पुस्तक लिहीले आहे. तेच पुस्तक मी उद्धव ठाकरे यांना भेट दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां कशा पद्धतीने लढवल्या जाव्यात, याबाबत दोन्ही पक्षांनी काही भूमिका मांडल्या आहेत. आमचा निर्णय आम्ही सविनय सांगितल आहे. निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील. आमची चर्चा ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी झाली आहे. जे कोणी आमच्याकडे येतील त्यांना सोबत घेण्याचा आमचा विचार आहे.
लोकशाहीचे संरक्षणासाठी आम्ही ‘इंडिया आघाडी’च्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. जोपर्यंत हा उद्देश कायम आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीदेखील टिकून राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढायच्या की स्वतंत्रपणे, याचा निर्णय निवडणुका जाहीर झाल्यानंतर घेतला जाईल. स्थानिक स्तरावर सविस्तर चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट वक्तव्य सपकाळ यांनी केले. दरम्यान, सपकाळ यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची नेमकी भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.