फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
उरुळी कांचन : संत तुकाराम महाराज यांची पालखी उरुळी कांचन ग्रामस्थांच्या प्रचंड विरोधामुळे गावात न थांबता सरळ निघून गेली. ग्रामस्थांनी सुरुवातीला पुणे सोलापूर रोडवर ठाण मांडत, भजन,किर्तन करत ठिय्या आंदोलन केले. नंतर नगाऱ्याची बैलगाडी अडवून पालखी सोहळा आत नेण्यासाठी आग्रह धरला. परंतू पोलीस प्रशासनाला हाताशी धरलेल्या विश्वस्तांनी नगाराच्या बैलगाडीचे बैल सोडून पुणे -सोलापूर रोडवर नेले. नंतर पोलिसांनी बैलगाडी स्वतः ओढत त्या बैलांपर्यंत नेऊन पालखी पुणे -सोलापूर रोड वरूनच जाईल, अशा पद्धतीची भूमिका घेतली. मग मात्र ग्रामस्थांनी पालखी गावातून जाणार नसेल, तर आमच्या गावात थांबू नये अशा पद्धतीची भूमिका घेत प्रशासनाला व पालखी सोहळा प्रमुखांना तशा पद्धतीचे कडक बोल सुनावले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख एका विश्वस्ताच्या आडमुठपणाच्या भूमिकेचा फटका असंख्य दिंड्यांमधील वारकऱ्यांना, पालखी सोहळ्या मधील वारकऱ्यांना बसला. गेल्या शंभर वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार,संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन गावातील मारुती मंदिरामध्ये विसावा घेत होता. दोन वर्षापासून पालखी सोहळा प्रमुख व ग्रामस्थ यांच्यात या विसाव्याच्या ठिकाणाबाबत मतभेद होत होते, त्यामुळे एक वर्ष पालखी सोहळा सोलापूर रोडवरच तळवाडी येथे थांबला. दुसऱ्या वर्षी पालखी सोहळा गावात येऊन मारुती मंदिरासमोर न थांबता महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर विसाव्याला थांबला. चालू वर्षीही ग्रामस्थांचे म्हणणे तेच होते आणि त्यांनी पालखीच्या विसाव्यासाठी महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर चोख बंदोबस्त व तयारी केली होती.
ग्रामस्थांचे म्हणणे असे होते की, पालखी सोहळा उरुळी कांचन आश्रम रोड वरून बाजारपेठेतून महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर जावा. तिथे विसावा घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे पालखी सोहळा तळवाडी वरुन पुणे सोलापूर रोडला लागून, यवत मुक्कामासाठी रवाना व्हावा. मात्र या भूमिकेला पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे यांचा गेल्या दोन महिन्यापासून विरोध होता आणि ते ग्रामस्थांच्या कोणत्याही विनंतीला प्रतिसाद देत नव्हते. अगदी काल रात्री साडेअकरापर्यंत लोणी येथील मुक्कामाच्या ठिकाणी, उरुळी कांचनचे जेष्ठ नेते के.डी.कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाची विश्वस्त संभाजी कांचन, सरपंच अमित कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, राजेंद्र ब.कांचन यांच्यासह अनेकांनी विश्वस्तांची गाठ घेऊन, पालखी सोहळा नेहमीच्या पद्धतीने उरुळी कांचन येथे आणावा अशी भूमिका मांडली. परंतू या भूमिकेला माणिक मोरे यांनी किंचितही प्रतिसाद न देता ताठरपणाची भूमिका घेत, मी पालखीचा मालक आहे, मी ठरवीन पालखी कशी न्यायची असे उद्गार काढले. उलट पक्षी ग्रामस्थांना तुम्ही अडवून बघा मी काय करतो ते अशाच पद्धतीची दमदाटीची भाषा वापरली. त्यामुळे आज उरुळी कांचनच्या नागरिकांनी जर पालखी सोहळा आश्रम रोडने महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर जाणार नसेल, तर पालखी सोहळा आमच्या गावात थांबवू नये अशी भूमिका घेऊन, पालखी सोहळ्याला उरुळी कांचन येथे थांबण्यास अटकाव केला.
महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन पालखी सोहळा विश्वस्तांच्या मनमानीला बळी पडत लाखो भाविकांच्या संत तुकाराम महाराज यांच्यावरील श्रद्धेच्या, भावनेच्या आड आले. लाखो महिला संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनापासून वंचित राहिल्या. शिवाय पालखी सोहळ्यातील अश्व, नगाऱ्याच्या गाडीचे बैल, आणि पालखीच्या रथाचे बैल यांचेही प्रचंड हाल झाले. उरुळी कांचन मधील ग्रामस्थांनी महात्मा गांधी विद्यालयात विसाव्याच्या ठिकाणी निषेध सभा घेऊन, पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त आणि विशेष करून माणिक मोरे यांचा कडक शब्दात निषेध केला आहे. या सभेला उरुळी कांचनचे जेष्ठ नेते के.डी.कांचन, देविदास भन्साळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त संभाजी कांचन, सरपंच अमित कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, राजेंद्र ब.कांचन, दत्तात्रय शां.कांचन,माजी उपसरपंच युवराज कांचन,भाऊसाहेब तुपे, अलंकार कांचन, शरद वनारसे यांच्यासह प्रचंड संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या सर्व प्रकारामुळे इतिहासात पहिल्यांदाच संत तुकाराम महाराज पालखीला उरुळी कांचन मधून स्वागताविना पुढे जावे लागले. सोहळा प्रमुखांच्या या भूमिकेचा उरुळी कांचन मधीलच नव्हे तर पंचक्रोशीतील तमाम नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध करून, अशा पद्धतीने पालखी सोहळा चालवण्याच्या पद्धतीला आक्षेप घेतला आहे.