फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय व चर्चेतील शाखा म्हणजे कम्प्युटर सायन्स (B.Tech Computer Science – CSE) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (B.Tech Artificial Intelligence – AI). दोन्ही शाखांचा करिअर स्कोप प्रचंड आहे आणि भविष्यात त्यांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या मनात नेहमीच प्रश्न निर्माण होतो. नेमके कोणत्या शाखेत करिअर करावे आणि कोणत्या क्षेत्रात जास्त कमाई मिळू शकते?
कम्प्युटर सायन्स ही अभियांत्रिकी क्षेत्रातील कायमच सर्वाधिक मागणीची शाखा मानली जाते. या शाखेत प्रोग्रॅमिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा स्ट्रक्चर, सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कंप्युटिंग यांसारख्या मूलभूत पण अत्यावश्यक विषयांवर भर दिला जातो. आयटी सेक्टर, सॉफ्टवेअर कंपन्या, मल्टिनॅशनल कंपन्या तसेच स्टार्टअप्समध्ये CSE ग्रॅज्युएट्सची कायम मागणी असते.
पगाराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सुरुवातीच्या टप्प्यावर कम्प्युटर सायन्स इंजिनियरला सरासरी ४ ते ७ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळते. अनुभव आणि कौशल्ये वाढल्यास हे पॅकेज २० ते ३० लाख रुपये वार्षिक इतकेही जाऊ शकते.
आजच्या आधुनिक युगातील सर्वात वेगाने विकसित होणारे क्षेत्र म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या शाखेत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP), रोबोटिक्स, बिग डेटा अॅनालिटिक्स यांसारखे विषय शिकवले जातात. AI तज्ज्ञांची मागणी हेल्थकेअर, फायनान्स, ऑटोमोबाईल, ई-कॉमर्स, रिसर्च आणि संरक्षण क्षेत्रात प्रचंड आहे. या शाखेतील विद्यार्थ्यांना सुरुवातीला ६ ते १० लाख रुपये वार्षिक पगार मिळू शकतो. तर अनुभव व कौशल्यांनुसार हा पगार २५ ते ४० लाख रुपये वार्षिक इतका पोहोचू शकतो.






