फोटो सौजन्य: pinterest
“आषाढी कार्तिकी भक्तगण येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती” या फक्त गाण्याच्या ओळी नाही तर प्रत्येक वारकऱ्यांच्या मनातील भावना आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा असा हा पंढरीचा राजा एकमेव देव आहे, ज्य़ाला माऊली म्हटलं जातं. या माऊलीच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा मेळा पंढरपूरी पायी चालत जातात. वारी म्हणजे काय ? आणि वारीला इतकं महत्व का दिलं जातं ? वारीची ही गोष्ट आज जाणून घेऊयात.
वारीला फक्त धार्मिक महत्वच नाही तर ती महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण देखील आहे. याबाबत जेष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक सदानंद मोरे यांनी एका पॉडकास्टमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. वारीचं महत्व आणि त्याबाबची भावनिक नाळ प्रत्येक मराठी माणसाशी जोडली गेली आहे. दरवर्षी वारी करणारेच नाही तर ज्यांना वारीला जाणं होत नाही अशाही प्रत्येक मराठी मनात वारीचं विशेष महत्व आहे.
जसं जेजुरीचा खंडेराय किंवा तुळजाभवानीचा जागरण गोंधळ घातला जातो. ही या देवदेवतांची उपासना मानली जाते. महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. त्याचप्रमाणे वारी म्हणजे विठ्ठलाची केलेली उपासना आहे, असं इतिहास संशोधक सदानंद मोरे यांनी सांगितलं आहे. नामस्मरण आणि किर्तनाप्रमाणे वारीला देखील पवित्र दर्जा प्राप्त आहे. तसं पाहायला गेलं तर विठ्ठलाचे भक्त कधीही वाटलं तर पंढरपूराला जाऊ शकतात मात्र वारी म्हणजे ठाराविक काळाने का होईना वारंवार समूहाने केलेली विठ्ठलाची उपासना म्हणजे वारी होय. परामार्थ प्राप्त करायचा असेल तर देवाची आराधना ही एकट्याने करणं. तपश्चर्या करुन आत्मा शुद्ध ठेवणं म्हणजे परामार्थ गाठणं होय.
मात्र असं असलं तरी संत तुकोबा असं म्हणतात की, “एकलिया भावबळे कळी सापडे तो काळे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसी” तुम्ही वैयक्तिक पातळीवरती जर देव शोधायचा प्रयत्न केला तर तो भेटेलही पण तो खूप काळाने भेटेल. मात्र वैष्णवांच्या समूहाने तो एका हाकेवर धावून येईल. समूहाने केलेल्या भक्तीचं सामर्थ्य हे जास्त आहे. त्यामुळे पंढरीच्या राजाला त्याच्या भक्तांच्या हाकेला प्रतिसाद हा द्यावाच लागतो. यामागे संत तुकोबांनी आपल्या अभंगातून एक सामाजिक विचार सांगितला आहे.
जेव्हा समूहाने एखादी कृती घडते तेव्हा त्याचे पडसाद हे मोठे असतात. महाराष्ट्राची वारी ही समूहाने होते म्हणून भक्तीपंरपरेत तिला विशेष स्थान आहे. संत तुकाराम महाराजांनी भक्तीपरंपरेतून हीच शिकवण दिली आहे की समाज जेव्हा एका उद्देशाने मतभेद न राखता एकत्र येतो तेव्हा त्यातून होणारं कार्य हे शुभ कार्य ठरतं. वारी हे त्यातचं एक उदाहरण आहे. हीच शिवकण संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून देतात.