फोटो - सोशल मीडिया
नागपूर : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पार्टी देखील ॲक्शन मोडमध्ये आली आहे. निवडणूक आयोगाने अद्याप कार्यक्रम जाहीर केला नसला तरी दिवाळीनंतर राज्याची विधानसभा निवडणूक होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नेत्यांचे दौरे वाढले आहेत. पक्षांतर आणि आरोप प्रत्यारोप देखील वाढले आहेत. आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप व आरएसएस हे खोटारडे संघटन असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
कोर्टातील याचिका मागे घेतली का?
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर जातीय जनगणनेवरुन महायुती व भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “भाजप व आरएसएस यांच्यासारखे खोटारडे संघटन कुठेच नाही. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जातीय जनगणना करुच शकत नाही. करणार नाही, या आशयाची याचिका दाखल केली आहे. आता झारखंड, हरियाणा, महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन ओबीसी समाजाला जवळ करण्यासाठी आम्ही जातीय जनगणना करण्यास तयार आहोत. मात्र, त्याचा राजकारणासाठी वापर होऊ नये असं म्हणत आहेत, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावरुन त्यांनी मोहन भागवत यांना देखील निशाण्यावर धरलं. प्रकाश आंबेडकर म्हणाले, माझं मोहन भागवतांना चॅलेंज आहे की, तुम्ही कोर्टात दिलेली याचिका मागे घेतली का? याचा खुलासा आधी करावा,” असे ऑपन चॅलेंज प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.
आम्ही सांगितलेले चूक असेल तर…
राज्यामध्ये सध्या एसटीचा संप सुरु आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून सणासुदीचा काळ असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “या आंदोलनाचा मोठा फटका प्रवाशांना बसतो आहे. मागच्यावेळी काय मागायला पाहिजे हा तोडगा आम्ही त्यांच्यापुढे मांडला होता. पण एसटी कामगारांना तो तोडगा मान्य नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवशाही बसेस चालविल्या त्यावेळी डिझेल 56 रुपयांच्यावर झालं तर एसटी महामंडळ भरेल, असा करार झाला होता. त्या विरोधात तुम्ही आवाज उठवा, आज डिझेल 90 रूपये आहे. मालक 56 भरतो त्याचं बजेट सांगा. एसटी महामंडळात चाललेलं भ्रष्टाचार हे बाहेर काढत नसतील. त्यामुळे त्यांच्याच नोकऱ्यावर गदा येणार, हे तेव्हा ही मी सांगितले होते. आम्ही सांगितलेले चूक असेल तर चूक आहे म्हणा,” असे मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे.






