सुकन्या समृद्धी योजनेतील रक्कम 21 वर्षांपूर्वीही मिळणार; उच्च शिक्षण, विवाहासाठी अंशतः पैसे काढता येणार (फोटो-सोशल मीडिया)
पुणे : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या पालकांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेतील रक्कम मुदतपूर्तीपूर्वीही विशिष्ट अटींवर काढता येते. मात्र, यासाठी शासनाने काही नियम निश्चित केले आहेत.
सुकन्या समृद्धी योजना ही मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. नियमानुसार मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा ती दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातील शिल्लक रकमेपैकी ५० टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी आहे. ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात असलेल्या शिल्लक रकमेनुसार निश्चित केली जाते.
सदर रक्कम उच्च शिक्षण किंवा इतर पात्र कारणांसाठी वापरता येते. त्यासाठी संबंधित बँक किंवा टपाल कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर रक्कम मंजूर केली जाते. ही रक्कम एकरकमी अथवा टप्प्याटप्प्याने घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, वर्षातून एकदाच रक्कम काढता येते आणि ही सुविधा कमाल पाच वर्षांसाठी लागू राहते.
योजनेअंतर्गत खाते २१ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी बंद करण्याचीही तरतूद आहे. मुलीच्या विवाहाच्या एक महिना आधी किंवा विवाहानंतर तीन महिन्यांच्या आत खाते बंद करता येते. तसेच खातेदार मुलीचे निधन झाल्यास खाते तातडीने बंद करण्याची परवानगी दिली जाते. तज्ज्ञांच्या मते, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या पालकांनी पैसे काढण्याच्या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजनेतील पैसे काढण्याचे नियम :
– मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे किंवा ती दहावी उत्तीर्ण असावी
– खात्यातील शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत रक्कम काढता येते
– वर्षातून एकदाच पैसे काढण्याची परवानगी
– सुविधा कमाल पाच वर्षांसाठी उपलब्ध
– शिक्षण किंवा विवाहासाठी प्राधान्याने वापर करता येतो
– संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करणे आवश्यक






