पुरंदरचे महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे (फोटो- टीम नवराष्ट्र)
सासवड: विमानतळ प्रकल्पामुळे पुरंदरची संपूर्ण जगात ओळख निर्माण होणार आहे प्रकल्प झाल्यानंतर हजारो युवक, युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. भविष्यात पुरंदरच्या युवकांना इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. काही लोकांना स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यामध्ये आडकाठी आणली जात आहे. त्यांना विकास महत्वाचा नाही तर स्वतःची दुकानदारी चालू ठेवण्यासाठी प्रकल्पांना विरोध केला जात आहे. महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला मोबदला देवून प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करून येईल. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील विमानतळ प्रकल्प परिसरातील पारगाव मेमाणे येथील कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विजय शिवतारे यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप यादव, तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे, माजी सभापती अतुल म्हस्के, माजी उपसभापती दत्ता काळे, महिला आघाडीच्या ममता शिवतारे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य माणिक निंबाळकर, रमेश इंगळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभव मेमाणे, अभिजीत मेमाणे, रोहित पवार, गणेश मेमाणे, अमोल मेमाणे, निलेश मेमाणे, दशरथ मेमाणे, अनिल मेमाणे, प्रसाद मेमाणे, स्वप्नील मेमाणे, संतोष सावंत, अनिल गांजुरे, आप्पा सावंत आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पारगावचे शाखाप्रमुख गजानन मेमाणे, तालुका प्रमुख युवा सेना नितीन कुंजीर, बेलसरचे माजी उपसरपंच धीरज जगताप उपस्थित होते.
हेही वाचा: दिलेला शब्द पाळत नसाल तर…; विजय शिवतारेंचा अजित पवारांवर संताप
पुरंदरला आंतरराष्ट्रीय प्रकल्प कोणाला माहितीही नव्हते अशा संकल्पना साकारल्या जात आहे. यापाठीमागे विजय शिवतारे यांची दूरदृष्टी आहे. गरीबाच्या पोटाला जन्माला आलो तरी गरीब म्हणून मारायचे नाही, तर आपले अस्तित्व निर्माण करायचे ही जिद्द शिवतारे यांनी निर्माण केली आहे. विजय शिवतारे यांच्यामध्ये असाध्य गोष्टी सहज साध्य करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कोणत्याही पदावर नसताना तालुक्याला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत आहे. या पुढील काळात तालुक्यात विकासाची गंगा वाहण्यासाठी शिवतारे यांना निवडून द्यावे असे आवाहन युवा सेना प्रमुख नितीन कुंजीर यांनी केले आहे.
शिवतारे यांची अजित पवारांवर टीका
राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेसची महायुती आहे. महायुतीचे अधिकृत तिकीट मला देण्यात आले आहे. केंद्रात सरकार महायुतीचे असताना महायुतीचे सरकार येणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मला ताकद देण्याऐवजी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाडण्यासाठी प्रचंड ताकद लावली, पैसे लावले त्यांनाच उमेदवारी दिली जात असेल तर दुर्दैवी असून संभाजीराव झेडे यांचा महायुतीशी काय संबंध आहे ? अजित पवार यांच्या प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी साथ दिली, अशा डॉ. दिगंबर दुर्गाडे यांना तिकीट दिले असते तर मी समजू शकलो असतो. आपण शब्द दिलेले असताना पुन्हा पाळत नसताल तर तुमची विश्वासार्हता काय ? अशा शब्दात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.