सौजन्य - सोशल मिडीया
सासवड : राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेसची महायुती आहे. महायुतीचे अधिकृत तिकीट मला देण्यात आले आहे. केंद्रात सरकार महायुतीचे असताना महायुतीचे सरकार येणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे मला ताकद देण्याऐवजी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाडण्यासाठी प्रचंड ताकद लावली, पैसे लावले त्यांनाच उमेदवारी दिली जात असेल तर दुर्दैवी असून संभाजीराव झेडे यांचा महायुतीशी काय संबंध आहे ? अजित पवार यांच्या प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी साथ दिली, अशा डॉ. दिगंबर दुर्गाडे यांना तिकीट दिले असते तर मी समजू शकलो असतो. आपण शब्द दिलेले असताना पुन्हा पाळत नसताल तर तुमची विश्वासार्हता काय ? अशा शब्दात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
पुरंदरमधून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांना महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीतील शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारी जाहीर केलेली असताना महायुतीचे नुकसान होवू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची माझ्याशी मिटिंग झाली. त्यावेळी उमेदवारी माघारी घेण्यासाठी माझ्या मतदार संघातील सर्वच्या सर्व कामे मजूर करण्याची अट घालून सर्व कामे पालखी तळावर येवून जाहीररीत्या सांगावे अशी विनंती केली होती. त्यानंतर पालखी तळावर एका मेळाव्यात त्यांनी येवून सांगितले होते. तसेच पुरंदरचा पुढचा किल्लेदार विजय शिवतारे आहे. हे सुध्दा अगोदर जाहीर केले असताना ज्यांचा महायुतीशी कोणताही संबंध नाही अशा व्यक्तींना तिकीट दिले जात असेल तर ते महायुतीचे नुकसान होणार आहे. पुरंदरला गुंजवणी धरण किती माहिती होते. पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येवू शकतो हे कुणाला माहिती होते ? १६ वर्षे बंद असलेले गुंजवणी धरण मी मंत्री झाल्यावर अडीच वर्षात पूर्ण केले. दोन हजार शेततळी उभी केली. मुख्यमंत्री सडक योजनेतून १७८ किमीचे गावागावांना जोडणारे रस्ते पूर्ण केले.
कोणालाही सुचला नाही असा जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराचा ३४६ कोटींचा विकास आराखडा बनविला. महाविकास आघाडीने तो सडवला. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यास मंजुरी मिळवली आणि १०९ कोटी निधीतून कामही सुरु केले. त्यामुळे आता कशाही लढती होवू द्या, पुरंदरच्या जनतेनेच ठरविले आहे की, विजय बापू आपल्याला परत आवश्यक आहे. त्यांनी माघार घेऊ न घेवू मला किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काहीही फरक पडत नसल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
पैशांपुढे स्वाभिमान जात असेल तर दुर्दैव?
गुंजवणीचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार करीत नसल्याने उपोषण केले त्यात माझी किडनी खराब झाली. त्यामुळे लोकांसाठी असा त्याग करावा लागतो. केवळ पैशांच्या जोरावर सर्व गोष्टी शक्य होत नाहीत. त्यांना उमेदवारी का दिली याबाबत मी फोन केला नाही आणि करणारही नाही. सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली होती. त्या निवडून येणे आवश्यक होते. मात्र त्यात खोडा घालणारी व्यक्ती संपूर्ण तालुक्याला माहिती असताना तिकीट देताय? पत्नीच्या विरोधात प्रचार करणाऱ्याला तिकीट देताय? त्यामुळे पैशांपुढे स्वाभिमान जात असेल तर दुर्दैव आहे, असा संताप विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे.