वडगाव मावळमध्ये पारंपारिक स्मशानभूमी पाडल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांचे आंदोलन केले (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुक्यातील बधलवाडी, मेंढेवाडी आणि जाधववाडी येथील पारंपरिक स्मशानभूमी पाडल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी वडगाव मावळ (Wadgaon Maval) येथे प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात महिला, पुरुष तसेच तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे हद्दीतील बदलवाडी, मेंढेवाडी व जाधववाडी या गावांची पारंपरिक व वहिवाटीची स्मशानभूमी तळेगाव दाभाडे एमआयडीसी कार्यक्षेत्रातील कंपन्यांसाठी पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांवर आपल्या नातेवाईकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही संघर्ष करण्याची वेळ आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Maval News)
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी सोमवार (दि.१६ मार्च २०२६) पासून मावळ पंचायत समिती चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी ग्रामस्थांनी गावदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात दर्शन घेऊन आंदोलनाची सुरुवात केली. यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने पोटोबा महाराज मंदिर ते मावळ पंचायत समिती चौक या मार्गावर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. या प्रेतयात्रेद्वारे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हे देखील वाचा : AIमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ; CM देवेंद्र फडणवीसांना विश्वास
ग्रामस्थांनी सांगितले की, “हा प्रश्न गावकऱ्यांच्या जीवनाशी निगडित अत्यंत गंभीर आहे. नुकतेच बदलवाडी येथील तानाजी भाऊ डिंबळे यांचे निधन झाले. मात्र गावात स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा उपलब्ध झाली नाही. परिणामी त्यांच्या नातेवाईकांना तीव्र उन्हात उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागले, ही अत्यंत वेदनादायक घटना घडली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही एका आदिवासी कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा अंत्यविधी घराशेजारील शेतात करावा लागल्याची घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, “१९९४ साली नवलाख उंबरे परिसरातील बदलवाडी, मेंढेवाडी, जाधववाडी आदी गावांमधील सुमारे साडेबारा शंभर एकर जमीन अत्यल्प मोबदल्यात एमआयडीसीला देण्यात आली होती. त्या वेळी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गावासाठी किमान पाच एकर जागा स्मशानभूमी, क्रीडांगण व इतर सार्वजनिक सुविधांसाठी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक वर्षे उलटूनही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही.”
हे देखील वाचा : राजकीय नेत्यांच्या प्रशिक्षणाला ‘ब्रेक’, नगरसेवकांची दांडी; रिकाम्या खुर्त्यांचीच चर्चा
उलट गावांमधील अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमी पाडून ती जागा कंपन्यांना देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांवर अत्यंत अमानवी परिस्थिती ओढवली असल्याचे त्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी स्पष्ट केले की, आम्ही विकासाला विरोध करत नाही; मात्र माणसाला जिवंत असताना आणि मृत्यूनंतरही सन्मान मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने तातडीने स्मशानभूमीसाठी किमान चार ते पाच एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन दिले.
या आंदोलनात माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी दाभाडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र कडलक माजी उपसभापती शांताराम कदम, निवृत्ती शेटे, प्रशांत भागवत, आजी माजी पदाधिकारी यांनीही सहभाग घेत ग्रामस्थांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. ग्रामस्थांनी इशारा दिला की, स्मशानभूमीसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी एमआयडीसी प्रशासनावर राहील.






