मोठी बातमी! कुणाल कामरा, सुषमा अंधारे अडचणीत; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर
राज्याच्या राजकारणात आणि मनोरंजन विश्वात गाजलेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावाला अखेर विधिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सोमवारपर्यंत त्यांना अधिकृत नोटीस पाठवली जाणार आहे.
पावसाळी अधिवेशनात हा ठराव विधिमंडळात मंजुर झाला आहे. कुणाल कामराने आपल्या ‘नया भारत’ या स्टँडअप शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक शैलीत टीका करत एक व्यंगात्मक गाणं सादर केलं होतं. यामध्ये त्यांनी शिंदे यांची दाढी, चष्मा आणि शिवसेनेतील बंडखोरीवर कोपरखळ्या मारल्या होत्या. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. काही शिवसैनिकांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली, तर त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या
या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनीही त्या गाण्याचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आणि स्वतः व्हिडिओ तयार करून त्याला समर्थन दिलं. यामुळे त्या देखील वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. याच कारणांवरून विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोघांविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता.
प्रस्तावामध्ये दरेकर यांनी म्हटलंय की, “सुषमा अंधारे यांची भाषा ही अत्यंत खालच्या पातळीवरची असून, कुणाल कामराने उपमुख्यमंत्र्यांविरोधात मुद्दामहून वैयक्तिक आणि उपरोधिक गाणं तयार केलं आहे. ही दोघांची कृती सभागृहाचा आणि त्याच्या सदस्यांचा अवमान करणारी आहे.” या भूमिकेची गंभीर दखल घेत सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे कारवाईसाठी सुपूर्त केल्याचं जाहीर केलं.
त्यावर हक्कभंग प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सुषमा अंधारे आणि कुणाल कामराच्या अडचणी वाढ झाली आहे. आता विरोधी पक्ष याला कसं प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागलं आहे.