महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
वाई : वाई शहरातील महागणपती मंदिर परिसरातील गणपती घाटावर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसून येत आहे. या मंदिरासमोरील जागेमध्ये खाजगी पार्किंग व्यवस्थेमुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून होत आहेत. वाहन पार्किंगमध्ये घेताना पावतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रस्त्यावरच वाहनांची रांग लागत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे चित्र या परिसरात वारंवार पाहायला मिळत आहे.(Wai Mahaganpati Ghat:)
महागणपती मंदिरासमोरील हा परिसर वाई शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत वाहनांची गर्दी वाढली की वाहतुकीची कोंडी काही वेळातच गंभीर स्वरूप धारण करते. खासगी पार्किंगमुळे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत असेल, तर संबंधित व्यवस्थेची नगरपालिकेने तातडीने तपासणी करून नियमबाह्य प्रकार असल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Satara Crime: पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलने उचललं टोकाचं पाऊल
होमगार्ड उभे मात्र वाहतूक नियंत्रणाला मर्यादा या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्ड तैनात असले तरी वाहनचालकांकडून त्यांच्या सूचनांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी वाहने अस्ताव्यस्त उभी राहतात आणि काही वेळातच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे केवळ होमगार्ड तैनात करून प्रश्न सुटणार नसून वाहतूक नियोजन, पार्किंगची शिस्त आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. नदीक्षेत्रात पालिकेने पार्किंग उभारावे महागणपती परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपालिकेने नदीक्षेत्रातील उपलब्ध जागेचा नियोजनबद्ध वापर करून अधिकृत पार्किंग व्यवस्था उभारावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
अशी व्यवस्था झाल्यास मुख्य रस्त्यावर वाहनांचा भार कमी होईल, मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत होईल आणि नगरपालिकेलाही अधिकृत पार्किंग शुल्कातून उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होऊ शकतो ‘महागणपती’च्या पायथ्याशी कायमची वाहतूक कोंडी कशासाठी वाईच्या पर्यटन आणि धार्मिक वैभवाचा केंद्रबिंदू असलेल्या महागणपती परिसरातच जर नागरिकांना पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असेल, तर ही बाब प्रशासनासाठी गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. खासगी पार्किंगच्या व्यवस्थेमुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे या परिसराची पाहणी करून पार्किंगचे नियमन, वाहतूक नियंत्रण आणि पर्यायी पार्किंगची व्यवस्था याबाबत ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा महागणपती घाटावरील वाहतूक कोंडीचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत जाण्याची शक्यता आहे, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.






