
फोटो सौजन्य सोशल मीडिया
न्हाळेवाडी पुनर्वसन, सातारा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने केवळ पाहणी न करता तातडीने ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंचायत समिती वाईचे सभापती विक्रांत उर्फ भैय्या डोंगरे यांनी केली आहे.
वाई तालुक्यात ज्या-ज्या भागात बिबट्याच्या हालचाली सातत्याने आढळत आहेत, त्या ठिकाणी तातडीने पिंजरे बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरे आणि आवश्यक तांत्रिक यंत्रणा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. विशेषतः पश्चिम भागातील जंगलालगतची गावे, शिवार परिसर आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी वनविभागाने नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी डोंगरे यांनी केली आहे.
Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य
पश्चिम भागात माकडांच्या मोठ्या टोळ्यांमुळे वन्यजीवांच्या हालचाली वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बिबट्याच्या हालचालींचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. रात्री शेतात जाताना काळजी घेणे, लहान मुलांना एकटे बाहेर न पाठविणे आणि अंधाराच्या ठिकाणी जाणे टाळणे याबाबत नागरिकांना सूचना देणे आवश्यक आहे.
बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. “जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून पंचायत समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी दिली आहे. हे केवळ पद नसून जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे.
माझ्या तालुक्यातील एकाही कुटुंबाला बिबट्याच्या दहशतीत जगावे लागू नये,” अशी भूमिका विक्रांत उर्फ भैय्या डोंगरे यांनी व्यक्त केली. न्हाळेवाडी पुनर्वसन परिसरातील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बिबट्याचा वावर असलेल्या प्रत्येक गावात पाहणी करून धोकादायक ठिकाणांची नोंद, पिंजरे व कॅमेरे बसविण्यासह कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी वनविभागाकडे केली आहे.