
गॅस सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती होऊन अचानक भीषण आग
पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ रोहिदास टिके ठरले देवदूत
गॅस सिलेंडर बाहेर काढत वाचवले शेकडो वारकरी आणि भाविकांचे प्राण
वाई: “कर्तव्यापुढे स्वतःचा जीवही क्षुल्लक!” या उक्तीचा प्रत्यय देणारी थरारक घटना आषाढी वारीदरम्यान घडली. वाई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ रोहिदास टिके (बक्कल क्र. १२२९) यांनी आगीच्या भडक्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून तब्बल १५ ते १६ गॅस सिलेंडर बाहेर काढत शेकडो वारकरी आणि भाविकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या अद्वितीय शौर्यामुळे एक भीषण दुर्घटना टळली. दि. २४ जुलै २०२५ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाखरी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे दाखल होत असताना पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ टिके हे बंदोबस्ताच्या कर्तव्यावर होते.
यावेळी पालखीच्या सुमारे १०० मीटर पुढे दिंडीतील दोन ट्रकमधील गॅस सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती होऊन अचानक भीषण आग भडकली. क्षणाचाही विलंब न करता सोमनाथ टिके यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग लागलेल्या ट्रकमध्ये १५ ते १६ गॅस सिलेंडर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे सिलेंडर फुटले असते तर काही क्षणांतच स्फोटांची मालिका होऊन संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला असता आणि हजारो वारकऱ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता थेट जळत्या ट्रकमध्ये प्रवेश केला.
Bhandara News: दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहकाचा मृत्यू; कोरंभी परिसरातील बायपास मार्गावरील घटना
आगीच्या ज्वाळांमध्ये एकामागून एक गॅस सिलेंडर बाहेर फेकण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचवेळी ट्रकखाली आधीपासून जळत असलेल्या एका सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या प्रचंड धक्क्यानंतरही टिके यांनी धैर्य गमावले नाही. त्यांच्या मदतीला ट्रकमधील एक-दोन वारकरीही धावून आले आणि सर्वांनी मिळून उर्वरित सिलेंडर सुरक्षित बाहेर काढले.या धाडसी आणि प्रसंगावधान दाखवणाऱ्या कामगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली. असंख्य वारकरी, भाविक आणि नागरिकांचे प्राण वाचले.
अन्यथा या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची भीती होती. पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ टिके यांच्या या अतुलनीय शौर्याची आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत पालखी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती घनवट यांनी त्यांचा विशेष सत्कार करून सन्मानचिन्ह प्रदान केले. धोक्याच्या क्षणी स्वतःचा जीव पणाला लावून जनतेचे प्राण वाचवणारे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ रोहिदास टिके हे खऱ्या अर्थाने वारकऱ्यांचे देवदूत ठरले असून, त्यांच्या शौर्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि धाडसाचा आणखी एक सुवर्ण अध्याय इतिहासात नोंदला गेला आहे.