नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ट्रकच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वरील नवीन बायपास मार्गावरील कोरंभी परिसरात घडली.
पुना नायक (३७, रा. देवगढ़, ओरिसा) असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्त दोन्ही वाहने बाजूला केली. रविवारी पहाटेच्या सुमारास एमएच-४०/सीए-११२७ क्रमांकाचा ट्रक सळाखीचे बंडल घेऊन रायपूरहून नागपूरच्या दिशेने जात होता.
यादरम्यान मागून कोळसा घेऊन येणाऱ्या डब्ल्यूबी-२३/जी-१५८८ क्रमांकाच्या ट्रकचालकाला डुलकी लागली. त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पुना जागीच ठार झाला. या मार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालक व नागरिकांनी या अपघाताची माहिती तत्काळ भंडारा शहर पोलिसांना दिली.






