
nagar parishad pulgaon
पुलगाव (वर्धा) : पुलगाव नगरपरिषदेत वाद काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. यापूर्वी सभागृहात कचरा फेकणे आणि सफाई कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेले भाजप गटनेते प्रवीण पुनिया आता पुन्हा एका नव्या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. फॉगिंगच्या कामावरून झालेल्या वादात त्यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी संजय वानखेडे यांच्या अंगावर दुचाकी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Wardha News)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी संजय वानखेडे नगरपरिषदेच्या पोर्चमध्ये उभे होते. याचवेळी भाजप गटनेते प्रवीण पुनिया तेथे आले. फॉगिंगच्या कामावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादादरम्यान पुनिया यांनी वानखेडे यांना शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर थेट दुचाकी त्यांच्या अंगावर नेल्याचा आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप वानखेडे यांनी तक्रारीत केला आहे.
या प्रकारामुळे नगरपरिषद परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी काही कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार नगरपरिषदेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची चर्चा आहे.
घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी थेट पुलगाव पोलीस ठाणे गाठत पुनिया यांच्याविरोधात तक्रार दिली. मात्र, तक्रार देऊनही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, रात्री संजय वानखेडे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा, नगराध्यक्ष कविता ब्रह्मणकर आणि काही नगरसेवकांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दुसरीकडे, प्रवीण पुनिया यांनीही पोलिसांत स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. वानखेडे यांनीच आपल्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि आक्रमकपणे अंगावर धावून आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपण त्यांच्यावर कोणताही हल्ला केला नसल्याचेही पुनिया यांनी स्पष्ट केले.
तसेच, लोकप्रतिनिधी म्हणून सार्वजनिक कामकाजाबाबत सूचना देत असताना कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
आता या प्रकरणात नेमकं सत्य काय, हे सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुलगाव पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: नगरपरिषद कर्मचारी संजय वानखेडे यांनी फॉगिंगच्या कामावरून झालेल्या वादात प्रवीण पुनिया यांनी दुचाकी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.
Ans: पुनिया यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. उलट संजय वानखेडे यांनीच शिवीगाळ करून अंगावर धावून आल्याचा दावा करत त्यांनी पोलिसांत स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे.
Ans: घटनेच्या वेळी नगरपरिषद परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे फुटेज तपासल्यास नेमका प्रकार काय घडला, हे स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते.