
फोटो सौजन्य - Social Media
कारंजा : गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करावे, देशातील सर्व गाईंचे कत्तलखाने बंद करावेत आणि गोहत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी बहुजन कृती समिती, वाशिम जिल्ह्याच्या वतीने कारंजा येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे तहसीलदार कारंजा लाड यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, या आंदोलनात मुस्लिम समाजातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्याने राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोख्याचा सकारात्मक संदेश दिला गेला. बहुजन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, गौमातेच्या संरक्षणाचा विषय कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नसून तो भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी व्यवस्थेशी निगडित आहे. त्यामुळे गोसंवर्धन आणि गोसंरक्षणाचा प्रश्न हा सर्व समाजघटकांचा समान विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पदाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, गौमातेला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी मुस्लिम समाजाने उचललेले पाऊल हे केवळ धार्मिक भावना व्यक्त करणारे नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. ज्या विषयावरून अनेकदा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, त्याच विषयावर विविध समाजघटक एकत्र येत असल्याने हे आंदोलन जातीय राजकारणाला सडेतोड उत्तर ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी किशोर मानकर यांनी गोमातेचे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित केले. गाईपासून मिळणारे शेण, मूत्र, दूध, दही, लोणी, ताक आणि तूप यामुळे शेतकरी तसेच ग्रामीण उद्योगांना मोठा आधार मिळतो. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि शेतीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी गोवंश संवर्धन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवेदनात केंद्र सरकारने लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करण्यासाठी आवश्यक विधेयक मंजूर करावे, देशातील सर्व गाईंचे कत्तलखाने बंद करावेत आणि गोहत्याबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या मागण्यांवर ९० दिवसांच्या आत निर्णय न झाल्यास व्यापक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बहुजन कृती समितीच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनाबाबत बोलताना समितीचे कार्यकर्ते राजू अवताडे यांनी सांगितले की, धार्मिक आणि सामाजिक मतभेद बाजूला ठेवून देशहिताच्या मुद्द्यावर विविध समाजघटक एकत्र येत असल्याचे हे आंदोलन दाखवून देते. अशा उपक्रमांमुळे समाजात परस्पर विश्वास, बंधुभाव आणि राष्ट्रीय ऐक्य अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी म्हटले.
विशेष म्हणजे, गौमातेला राष्ट्रीय माता अथवा राष्ट्रीय पशू घोषित करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी देशभर सुरू केलेले आंदोलन हे हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. गोसंरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेकदा वाद निर्माण होत असले तरी त्याच विषयावर विविध धर्मांचे नागरिक एकत्र येऊन भूमिका मांडत असल्याने समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. निवेदन सादर करताना अब्दुल राजीक शेख, विनोद गणवीर, धम्मपाल इंगळे, प्रदीप वानखडे, मनोज कानकिरड, दिलीप रोकडे, रमेश टूले, सुजित भगत, मन्नानभाई कामनवाले, मोहिनुद्दीन सौदागर, प्रमोद देवळे यांच्यासह बहुजन कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारंजा येथे झालेल्या या आंदोलनाने सामाजिक सलोखा, परस्पर विश्वास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत विविध समाजघटक एकत्र आल्यास कोणत्याही विषयावर सकारात्मक संवाद घडू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.