
फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध
शांततेत आंदोलन करणे हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार असल्याचे सांगत, केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. परीक्षांमधील पारदर्शकता, निकालांचे पुनरावलोकन, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करावी, दाखल गुन्हे मागे घ्यावेत आणि जखमी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही लावून धरण्यात आली.
रिसोडमध्ये कडकडीत बंद व धरणे आंदोलन
रिसोड येथील केशवनगर आणि शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठान बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, भारतीय बौद्ध महासभा व विद्यार्थी कृती समिती यांसारख्या समविचारी संघटनांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ‘भारत माता की जय’ आणि ‘जय भीम’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सोपवले.
देऊळगाव राजा येथे तहसीलदारांना निवेदन
देऊळगाव राजा येथेही तहसीलदारांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय थांबविण्याची मागणी करण्यात आली. या संपूर्ण आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.