
Karanja Cotton Crop Loss
खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. काही काळ पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला, तर त्यानंतरच्या वाढत्या तापमानाने पिकांवरील ताण आणखी वाढविला. कपाशीच्या पिकाला आवश्यक असलेल्या पोषक वातावरणाचा अभाव जाणवल्याने झाडांची वाढ, फुलधारणा आणि बोंडांच्या विकासावर परिणाम झाल्याचे शेतकायांचे म्हणणे आहे. कपाशीचे पीक चांगले येईल आणि वर्षभराचा आर्थिक भार हलका होईल, या अपेक्षेने शेतकायांनी बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर मोठा खर्च केला. मात्र, आता शेतात उभे असलेले पीक अपेक्षित उत्पन्न देईल की नाही, याबाबतच अनिश्चितता निर्माण झाली आहे.
काही भागांत कपाशीची वाढ समाधानकारक नसल्याने आणि अपेक्षेप्रमाणे बोंडे लागली नसल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी, कपाशीची लागवड करूनही शेतकायांच्या पदरी आर्थिक नुकसान पडण्याची भीती आहे. कारंजा तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकायांना प्रत्यक्ष उत्पादनाच्या आधारे नुकसानीचे मूल्यमापन, पीक परिस्थितीची पाहणी आणि पात्रतेनुसार शासकीय मदतीची अपेक्षा आहे. कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतांमधील परिस्थितीची पाहणी करून उत्पादनाचा अंदाज निश्चित करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने पीक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राची वस्तुनिष्ठ पाहणी, लागू निकषांनुसार मदतीची प्रक्रिया आणि पीकविमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या दाव्यांवर कार्यवाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
एकीकडे उत्पादन खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पन्नाची खात्री राहिलेली नाही. अशा परिस्थितीत कारंजा तालुक्यातील सुमारे १३ हजार ३७१ हेक्टरवरील कपाशीचे पीक शेतकऱ्यांना किती आधार देणार, हा प्रश्न निर्माण झाला. मेहनत, पैसा आणि वेळ खर्च करूनही अपेक्षित उत्पादन मिळत नसेल, तर शेतीचा आर्थिक ताळेबंद जुळवायचा कसा, अशी हतबलता कपाशी उत्पादक शेतक-यांमध्ये दिसून येत आहे.